शिक्षणातून समृद्ध राष्ट्रनिर्मितीचा नेहरूंचा संदेश विद्यार्थिनींपर्यंत पोहोचविला
जळगाव : डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन महाविद्यालयात भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात विद्यार्थिनी व शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. निलीमा वारके यांच्या हस्ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी प्रतिमेला वंदन करून आदरांजली वाहिली याप्रसंगी प्रा. आरती वर्मा यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या राष्ट्रनिर्मितीतील योगदानावर प्रकाश टाकला. नेहरू यांचे मुलांवरील विशेष प्रेम, शिक्षणाविषयीची दूरदृष्टी आणि आधुनिक भारताच्या उभारणीसाठी त्यांनी केलेले कार्य याविषयी त्यांनी माहिती दिली. शिक्षण हेच समृद्ध आणि प्रगत राष्ट्रनिर्मितीचे प्रभावी माध्यम असून, शिक्षणाच्या माध्यमातून समाजाचा सर्वांगीण विकास साधता येतो, हा नेहरूंचा विचार आजही तितकाच महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच बालदिनाचे महत्त्व विशद करून विद्यार्थिनींना नेहरूंच्या विचारांतून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन प्रा. शिवानी महाजन यांनी केले.










