५० लाखांचा विमा हडपण्याचा डाव फसला
जळगाव (प्रतिनिधी):- आजारपणामुळे मृत्यू झालेल्या एका व्यक्तीचा मृत्यू हा अपघाती मृत्यू असल्याचे भासवून, तब्बल ५० लाख रुपयांची विमा रक्कम हडपण्याचा धक्कादायक कट उघडकीस आला आहे. या गंभीर प्रकरणात जळगाव पोलीस दलातील चार पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध न्यायालयात खटला चालवण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे.

चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका व्यक्तीचा आजाराने मृत्यू झाला होता. मात्र, विम्याची ५० लाख रुपयांची मोठी रक्कम लाटण्याच्या उद्देशाने संबंधित व्यक्तीचा मृत्यू अपघातात झाल्याचा बनाव रचण्यात आला होता. तपासादरम्यान या संपूर्ण कटात मृताची पत्नी, भाऊ, एक वैद्यकीय अधिकारी, विमा एजंट यांच्यासह चार पोलीस कर्मचाऱ्यांचा थेट सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी पोलीस कर्मचारी रवींद्र बत्तीसे, सचिन निकम, सुनील निकम आणि महेंद्र पाटील यांच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करून खटला चालवण्यास शासनाने परवानगी दिली आहे. दरम्यान, मृताच्या फोटोवर असलेल्या मृत्यूच्या तारखेमुळे हा संपूर्ण बनाव उघडकीस आला आणि ५० लाखांचा विमा हडपण्याचा हा मोठा डाव अखेर फसला. या कारवाईमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.






