एकोरा नाल्याजवळ भल्या मोठ्या वाघाचे दर्शन; परिसरात तीन ते चार वाघ असल्याची चर्चा, वन विभागाने तातडीने दखल घेण्याची मागणी
यावल ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील मोहराळा-हरिपुरा रस्त्यावरील एकोरा नाल्याजवळ रात्रीच्या सुमारास भल्या मोठ्या पिवळसर रंगाच्या वाघाचे दर्शन झाल्याची घटना समोर आली आहे. ऐन रात्री रस्त्यावर वाघ दिसल्याने शेतकरी, दुचाकीस्वार आणि परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.फैजपूर येथून उपोषणासाठी निघालेले नितीन कोळी आणि पांढरा वस्ती येथील दशरथ भिल हे मोटारसायकलवरून प्रवास करत असताना त्यांना एक मोठा वाघ दिसल्याचे त्यांनी सांगितले.


अचानक समोर आलेल्या या वन्यप्राण्यामुळे त्यांची धांदल उडाली.दरम्यान, परिसरात एक नव्हे तर तीन ते चार वाघांचा वावर असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. वडरी धरणालगतच्या आसरबारी पाडा-वस्ती परिसरात तसेच नागादेवी भागातही वाघ दिसल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे या संपूर्ण परिसरात वन्यप्राण्यांच्या वावराबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
शेतात पिकांना पाणी देण्यासाठी अनेक शेतकरी रात्रीच्या वेळी जातात. तसेच ग्रामीण भागातील नागरिकांची ये-जा याच रस्त्यांवरून सुरू असते. अशा परिस्थितीत वाघाचा वावर नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गंभीर ठरू शकतो. शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी एकट्याने शेतात जाणे टाळावे आणि दुचाकीस्वारांनी विशेष खबरदारी घ्यावी.
वन विभागाने तातडीने दखल घेण्याची मागणी
या घटनेची वन विभागाने तातडीने दखल घेऊन मोहराळा-हरिपुरा रस्त्यावरील एकोरा नाला परिसरासह आसरबारी पाडा आणि नागादेवी भागात पाहणी करावी. वाघाच्या वावराची प्रत्यक्ष खातरजमा करून आवश्यक असल्यास गस्त वाढवावी. तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी परिसरातील शेतकरी आणि नागरिकांकडून होत आहे.वाघाच्या वावराबाबत कोणतीही अफवा पसरवू नये. वन्यप्राणी दिसल्यास त्याच्या जवळ जाण्याचा किंवा पाठलाग करण्याचा प्रयत्न न करता तातडीने वन विभागाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.








