धरणगाव तालुक्यात हनुमंतखेडे गावात थरकाप
धरणगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव जिल्ह्यात खुनांचा सत्र सुरूच असून, धरणगाव तालुक्यातून एक अत्यंत संतापजनक आणि हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. तालुक्यातील हनुमंतखेडा येथे मंगळवारी (दि. १० नोव्हेंबर) एका ६५ वर्षीय वृद्ध महिलेचा मृतदेह तिच्याच घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. आईच्या मृत्यूस तिचा ३५ वर्षीय मुलगाच कारणीभूत असल्याचा संशय असून, याप्रकरणी धरणगाव पोलिसांनी संशयित आरोपी मुलाला तातडीने ताब्यात घेतले आहे.


शरीफाबी रसूल पटेल (वय ६५, रा. हनुमंतखेडा) असे मयत महिलेचे नाव आहे, तर रशीद रसूल पटेल (वय अंदाजे ३५) असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित मुलाचे नाव आहे. मृत शरीफाबी पटेल या गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्यामुळे घरीच राहत होत्या. त्यांचा मुलगा रशीद पटेल हा दिवसभर गावात रिकामटेकडा फिरत असे. मंगळवारी (दि. १०) दुपारी २ ते २:३० वाजेच्या सुमारास माय-लेकात कौटुंबिक कारणावरून वाद झाला असावा. याच वादातून संशयित रशीद याने घरातील एखाद्या जड वस्तूने आई शरीफाबी यांच्या डोक्यात प्रहार केला असावा, असा दाट संशय गावकऱ्यांना व पोलिसांना आहे.
दुपारी अडीचच्या सुमारास संशयित रशीद अचानक घराबाहेर आला आणि शेजाऱ्यांना “माझी आई खाली पडली आहे,” अशी थातूरमातूर माहिती दिली. शेजाऱ्यांनी धाव घेऊन आत घरात पाहिले असता, शरीफाबी या रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेल्या आढळल्या. घटनेची तीव्रता लक्षात घेता ग्रामस्थांनी त्वरित पोलीस पाटील सुनील सोनवणे यांना संपर्क साधून माहिती दिली. पोलीस पाटलांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आणि तात्काळ धरणगाव पोलिसांना कळवले.
माहिती मिळताच धरणगाव पोलीस स्टेशनचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलीस व ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमसी) रवाना करण्यात आला. दरम्यान, संशयित रशीद पटेल याच्याकडे घटनेबाबत विचारणा केली असता तो पोलिसांना उडवाउडवीची व विसंगत उत्तरे देत असल्याने पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी त्याला तातडीने ताब्यात घेतले असून कसून चौकशी सुरू आहे. धरणगाव पोलीस स्टेशन येथे गुन्ह्याची नोंद करण्याचे काम सुरू होते.
दिवसाढवळ्या घडलेल्या या अंगावर काटा आणणाऱ्या घटनेमुळे हनुमंतखेडासह संपूर्ण पंचक्रोशीत तीव्र संताप व खळबळ उडाली आहे. पोटच्या मुलानेच आईचा खून केल्याच्या संशयामुळे हळहळ व्यक्त होत असून, जळगाव जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारी व खुनांच्या सत्रामुळे सर्वसामान्य नागरिकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे.








