आयकर ठरला मृताच्या वारसांचा आधार; चाळीसगाव येथील भीषण अपघात प्रकरण
जळगाव ( प्रतिनिधी ) – चाळीसगाव येथील भीषण अपघात प्रकरणामध्ये एसटी महामंडळाला ३८ लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश जळगाव न्यायाधिकरणाने काढले आहेत. या अपघातामध्ये दुचाकीस्वार मयत झाले होते. या निकालामुळे मयत व्यक्तीच्या नातेवाईकांना आधार व दिलासा मिळाला आहे.


चाळीसगाव येथील प्रसिद्ध उद्योगपती आणि प्रगतशील शेतकरी सदानंद मधुकर चौधरी हे दि. २१ डिसेंबर २०२४ रोजी मोपेडने घरी जात असताना, धुळे रोडवर शहादा ते छत्रपती संभाजीनगर जाणाऱ्या एसटी बसने त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या चौधरी यांचा धुळे येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान २४ डिसेंबर रोजी मृत्यू झाला. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस ठाण्यात एसटी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.यानंतर मृताची पत्नी मनीषा चौधरी, मुलगी निकिता, मुलगा भावेश आणि आई यांनी ॲड. महेंद्र सोमा चौधरी व सहकाऱ्यांमार्फत मोटार अपघात दावा प्राधिकरणाकडे (जळगाव) नुकसान भरपाईचा दावा दाखल केला.
दाव्याच्या सुनावणीदरम्यान अर्जदारांच्या वकिलांनी मृत व्यक्तीचे हॉटेल, बार, लॉजिंग व शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचे आणि त्यांनी नियमित भरलेल्या आयकराचे पुरावे न्यायालयात सादर केले. एसटी महामंडळाने चालकाचा बचाव करण्याचा प्रयत्न केला; परंतु ॲड. महेंद्र चौधरी यांनी ऑनलाईन पाहणी आणि उलट तपासणीद्वारे एसटी चालकाचाच निष्काळजीपणा सिद्ध केला.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आणि प्राधिकरणाचे सदस्य आर. एन. जोशी यांनी १ वर्ष, ४ महिने आणि ८ दिवसांच्या विक्रमी वेळेत या दाव्याचा निवाडा केला. मृत व्यक्ती नियमित आयकर भरत असल्याने त्यांचे अधिकृत उत्पन्न स्पष्ट झाले, ज्यामुळे नुकसान भरपाईची रक्कम एरवी मिळणाऱ्या १२ ते १५ लाखांवरून थेट ३८ लाख रुपये निश्चित करण्यात आली. या खटल्यात अर्जदारांतर्फे ॲड. महेंद्र सोमा चौधरी, ॲड. श्रेयस चौधरी, ॲड. हेमंत जाधव आणि ॲड. सुनील चव्हाण यांनी काम पाहिले, तर आ. मंगेश चव्हाण व समाजसेवक दिलीप चौधरी यांचे सहकार्य लाभले.
आयकर हा केवळ देशाच्या विकासासाठीच नव्हे, तर दुर्दैवी प्रसंगी कुटुंबाचा आर्थिक आधार टिकवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा पुरावा ठरतो, हे या निकालावरून सिद्ध झाले आहे.









