भाजी मागितल्याचे कारण ; चार जणांवर गुन्हा दाखल
जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव जिल्हा कारागृहात कैद्यांमध्ये आपसात हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. जेवणात भाजी मागितल्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून एका बंदीवानाला चौघा जणांनी मिळून मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा कारागृह वर्ग-२ मध्ये ३ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री साडेसात ते पावणेआठ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. फिर्यादी आकाश भानुदास गोरखा (वय २९, रा. रेल्वे बिल्डिंग, कष्टाडे नगर, भुसावळ, जि. जळगाव) हे कारागृहात बंदीवान असून, ते स्वतः या प्रकरणातील फिर्यादी आहेत.
घटना घडली त्या दिवशी फिर्यादीने न्यायाधीन बंदी हर्षल नाना गुरव याच्याकडे भाजी मागितली होती. याच कारणाचा राग मनात धरून आरोपी हर्षल याने फिर्यादीला काहीही कारण नसताना कानशिलात लगावली. तसेच इतर आरोपींनी संगनमताने फिर्यादीची मान पकडून त्यांना जमिनीवर खाली पाडले. लाथाबुक्क्यांनी व बेदम मारहाण केल्यामुळे फिर्यादीच्या ओठास सूज येऊन दात पाडल्याची व मुका मार लागल्याची तक्रार देण्यात आली आहे.
या प्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात हर्षल नाना गुरव (वय २४, रा. पिळोदा, ता. अमळनेर), बिरेद्रसिंग उर्फ विक्की गोविंदसिंग तोमर (वय ३६, रा. टाकळी, ता. चाळीसगाव), सागर रमेश कोळी (वय ३०, रा. साकेगाव, ता. भुसावळ), धनंजय उर्फ धिरज दत्तू कोळी (वय २२, रा. पाळधी, ता.धरणगाव) या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास पोउपनि गोपाळ देशमुख (नेमणूक, जिल्हा पेठ पोलीस ठाणे) करीत आहेत.








