उपचारांवरील चर्चेतून वाद; एकावर धारदार शस्त्राने वार

जोशीपेठेतील शनिपेठ पोलीस चौकीजवळील घटना; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
जळगाव : आजारावरील उपचारांसंदर्भात चर्चा सुरू असताना झालेल्या वादातून निनाद शाह याच्यावर धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना ३० ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास जोशीपेठेतील शनिपेठ पोलीस चौकीजवळ घडली. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील मेहरुण परिसरातील रजा कॉलनीत राहणाऱ्या बिबी जावेश शाह या ३० ऑक्टोबर रोजी नातू उमर शाह याच्या आजाराबाबत चर्चा करण्यासाठी जोशीपेठेत आल्या होत्या. त्यावेळी त्यांचा मोठा मुलगा सिनान शाह हा समोरील व्यक्तींशी चर्चा करीत असताना वाद झाला.
या वादादरम्यान आरिफ शाह यांनी आपल्या मुलाला चेतावणी दिल्यानंतर त्याने जवळ असलेल्या धारदार शस्त्राने निनाद शाह याच्या कपाळावर वार केला. यात निनाद गंभीर जखमी झाला. त्याने १ नोव्हेंबर रोजी शनिपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
या तक्रारीवरून हादी आरिफ शाह आणि आरिफ शाहर युसूफ शाह (दोघे रा. जोशीपेठ, जळगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हेडकॉन्स्टेबल उमेश ठाकूर पुढील तपास करीत आहेत.









