यावल शहरात घडली घटना
यावल प्रतिनिधी । शहरातील गणपती नगर परिसरात एका २० वर्षीय विवाहितेचा तिच्या पतीने चारित्र्याच्या संशयावरून गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

यावल पोलीस स्थानकात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, सुरत येथील रहिवासी असलेल्या सैय्यद अकबर सैय्यद छोटू यांच्या मुलीचा विवाह डिसेंबर २०२५ मध्ये यावल येथील गणपती नगर परिसरात राहणाऱ्या फरदीन खान याच्याशी झाला होता. विवाहानंतर ती पतीसह सासरी राहत होती. तिचा पती सोलर टेक्निशियन म्हणून काम करत होता. दरम्यान, आज दि. २ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास विवाहितेच्या पित्याला तिच्या सासरच्या मंडळींकडून फोनवरून घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर ते यावल येथे पोहोचले असता, त्यांच्या मुलीचा मृत्यू झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, घरातील परिस्थिती तसेच मुलीच्या मृत्यूबाबत त्यांना संशय निर्माण झाला. याबाबत त्यांनी सासरच्या मंडळींकडे विचारणा केली असता समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच मृत विवाहितेच्या शरीरावर काही जखमांचे निशाण असल्याचेही पित्याने तक्रारीत म्हटले आहे. यात चारित्र्याच्या संशयातून मारहाण केल्याने आपल्या मुलीचा मृत्यू झाल्याची फिर्याद त्यांनी दाखल केली आहे.
यानंतर संबंधित विवाहितेच्या पार्थिवाला यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पुढील कार्यवाही सुरू केली असून, मृत्यूचे नेमके कारण वैद्यकीय तपासणी आणि पोलिस चौकशीनंतर स्पष्ट होणार आहे. दरम्यान, या घटनेबाबत मृत विवाहितेच्या पित्याने यावल पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली असून, प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पुढील पोलिस तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








