जळगाव जिल्हा परिषदेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा छापा!
जळगाव (प्रतिनिधी) – ग्रामपंचायत अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरणाच्या बिलावर सही करून ते पुढील मंजुरीसाठी पाठवण्यासाठी तब्बल १० हजारांची लाच स्वीकारणाऱ्या जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाच्या उपविभागीय अधिकाऱ्यासह एका कनिष्ठ अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. २ नोव्हेंबर रोजी झालेल्या या धडक कारवाईमुळे जळगाव जिल्हा परिषद वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

सतीष मनसुलाल शिसोदे (वय ५५, रा. आदर्श नगर, जळगाव) असे उपविभागीय अधिकाऱ्याचे नाव असून, ते वर्ग-१ चे अधिकारी आहेत. तर श्री. भागवत वसंता चवरे (वय ३२) असे लाच स्वीकारणाऱ्या वर्ग-३ मधील कनिष्ठ अभियंत्याचे नाव आहे.
तक्रारदार हे एक सब-कॉट्रॅक्टर असून त्यांनी पिंप्री खुर्द (ता. धरणगाव) येथे सन २०२५-२६ मधील गाव अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरणाचे ९,९०,७६३ रुपयांचे काम पूर्ण केले होते. या पूर्ण केलेल्या कामाची एमबी (मोजणी पुस्तिका) व बिल तयार करण्यासाठी कनिष्ठ अभियंता भागवत चवरे याने यापूर्वीच तक्रारदाराकडून २० हजार रुपये घेतले होते. त्यानंतर बिलांना मंजुरी मिळण्यासाठी तक्रारदार हे उपविभागीय अधिकारी कार्यालयात गेले असता, अभियंता चवरे याने बिलावर सही करून ती पुढील मंजुरीसाठी उपविभागीय अधिकारी शिसोदे यांच्याकडे पाठवण्यासाठी एकूण बिलाच्या १.५ टक्के प्रमाणे १५, हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.
तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी या प्रकरणी २ नोव्हेंबर २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव कार्यालयात तक्रार दिली. प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने एसीबीच्या पथकाने पंचांसमक्ष कार्यालयीन पडताळणी केली. या दरम्यान तडजोडअंती १ टक्के प्रमाणे १०, हजार रुपये लाच देण्याचे ठरले. आज (दि. २) एसीबीच्या पथकाने कार्यालयात सापळा रचला. कनिष्ठ अभियंता भागवत चवरे याने तक्रारदाराकडून १०,००० रुपयांची लाच पंचांसमक्ष स्वतः स्वीकारून ती उपविभागीय अधिकारी सतीष शिसोदे यांना दिली. शिसोदे यांनी ती रक्कम स्वतःकडे घेतली. त्यानंतर एसीबीच्या पथकाने ती लाचेची रक्कम पंचांसमक्ष जप्त केली.
या कारवाईदरम्यान दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम ७, १२ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच आरोपींच्या अंगझडतीमध्ये उपविभागीय अधिकारी शिसोदे यांच्याकडे आयफोन व ९१,६२० रुपये रोख, तर कनिष्ठ अभियंता चवरे याडे विवो कंपनीचा मोबाईल व २०,६०० रुपये रोख रक्कम आढळून आली आहे. ही कारवाई ला.प्र.वि. नंदुरबारच्या पोलीस निरीक्षक श्रीमती रेश्मा अवतारे, पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर आणि त्यांच्या पथकाने पार पाडली.









