डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञांच्या उपचारांना यश
जळगाव ( प्रतिनिधी ) – किशोरवयात होणारे मानसिक बदल, भावनिक अस्थिरता आणि व्यसनाधीनता यांचा मुलांच्या वर्तनावर गंभीर परिणाम होऊ शकतो. अशाच प्रकारच्या समस्यांनी ग्रस्त असलेल्या बर्हाणपूर येथील १६ वर्षीय बालकावर डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील मानसोपचार विभागाने यशस्वी उपचार केले आहेत. चिडचिड करणे, घरातील सदस्यांना मारहाण करणे तसेच मद्य आणि गांजाच्या व्यसनाच्या आहारी गेलेल्या या बालकाला महिनाभराच्या नियमित उपचारांनंतर आणि समुपदेशनानंतर सकारात्मक बदल जाणवू लागले. उपचारांना बालकाने उत्तम प्रतिसाद दिल्याने त्याच्या मानसिक आरोग्यात लक्षणीय सुधारणा झाली आहे.
बर्हाणपूर येथील या बालकाच्या वर्तनात काही काळापासून बदल जाणवू लागले होते. लहानसहान कारणांवरून चिडचिड करणे, रागावर नियंत्रण न राहणे, घरातील व्यक्तींशी आक्रमकपणे वागणे आणि मारहाण करणे असे प्रकार वाढले होते. यासोबतच त्याला मद्य आणि गांजाचे व्यसनही जडले होते. त्यामुळे कुटुंबीय चिंतेत होते. बालकाच्या वर्तनातील बदलांचा त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर तसेच कौटुंबिक वातावरणावरही परिणाम होत होता. अखेर कुटुंबीयांनी त्याला उपचारासाठी डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील मानसोपचार विभागात दाखल केले. येथील मानसोपचार तज्ज्ञांनी बालकाची सविस्तर तपासणी करून त्याच्या मानसिक स्थितीचे मूल्यांकन केले. त्याच्या वर्तनामागील कारणे, मानसिक लक्षणे आणि व्यसनाशी संबंधित बाबींचा अभ्यास करून उपचारांची दिशा निश्चित करण्यात आली. त्यानंतर तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने औषधोपचारांसोबतच नियमित समुपदेशनावर भर दिला.महिनाभराच्या उपचारादरम्यान बालकाच्या मानसिक स्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात आले. त्याच्याशी संवाद साधून त्याच्या मनातील भावना, विचार आणि अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच कुटुंबीयांनाही बालकाच्या मानसिक स्थितीची माहिती देत त्याच्याशी संयमाने आणि सकारात्मक पद्धतीने वागण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. उपचार आणि समुपदेशनाच्या एकत्रित प्रयत्नांमुळे बालकाच्या वर्तनात हळूहळू सकारात्मक बदल दिसू लागले. चिडचिड आणि आक्रमकता कमी होण्यास मदत झाली आणि त्याने उपचारांना चांगला प्रतिसाद दिला. उपचारासाठी मानसोपचार विभागातील डॉ. हुमेद महाडिक, डॉ. हिमांशू जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. फरीन सुरैय्या यांनी सहकार्य केले.
कोट… या प्रकरणातून किशोरवयीन मुलांमधील मानसिक आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष न करता वेळीच तज्ज्ञांची मदत घेणे किती महत्त्वाचे आहे, हे अधोरेखित झाले आहे. मुलांच्या वर्तनात अचानक बदल होणे, सतत चिडचिड करणे, आक्रमकता वाढणे, एकलकोंडेपणा किंवा व्यसनाकडे कल वाढणे ही लक्षणे गांभीर्याने घेणे आवश्यक आहे.
– डॉ. फरीन सुरैय्या, डॉ. उल्हास पाटील रूग्णालय.










