वडिलांनी लेकीच्या स्वप्नांसाठी विकले दागिने; तेजस्विनीने स्केटिंगमध्ये गाठली यशाची उंची!

रिक्षाचालक वडिलांच्या संघर्षाला लेकीच्या जिद्दीची साथ; आंतरराष्ट्रीय रेकॉर्डनंतर दिल्लीत ‘स्वर्ण भारत’ पुरस्काराने सन्मान
जळगाव, प्रतिनिधी : लेकीने मोठे व्हावे, तिच्या कर्तृत्वाचा झेंडा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर फडकावा, यासाठी एका रिक्षाचालक वडिलांनी स्वतःच्या आर्थिक परिस्थितीची पर्वा न करता तिच्या स्वप्नांना बळ दिले. मुलीला चांगले स्केटिंग शूज घेता यावेत म्हणून घरातील सोन्याचे दागिने विकले, तर स्पर्धांसाठी बाहेरगावी जाण्याकरिता पैशांची जुळवाजुळव केली. वडील विनोद सोनवणे यांच्या या संघर्षाचे चीज करत तेजस्विनी सोनवणे हिने स्केटिंगच्या मैदानावर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील विक्रमाची नोंद आणि दिल्लीत मिळालेला ‘स्वर्ण भारत’ पुरस्कार यामुळे तिच्या यशाला नवी झळाळी मिळाली आहे.
जळगाव शहरातील आसोदा रस्त्यावरील तानाजी मालुसरे नगर येथे राहणारी तेजस्विनी नंदिनीबाई विद्यालयात नववीच्या वर्गात शिकत आहे. वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी तिने स्केटिंग शिकण्यास सुरुवात केली. सुरुवातीला शाळेतील छंद म्हणून सुरू झालेला हा प्रवास आज राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूपर्यंत येऊन पोहोचला आहे.
एका तासात ४२ किलोमीटर स्केटिंग
तेजस्विनीने २०२२ मध्ये जळगाव येथील पोलीस कवायत मैदानावरील रिंकवर सलग एका तासात ४२ किलोमीटर स्केटिंग करण्याची कामगिरी केली. तिच्या या विक्रमाची इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली. यापूर्वी २०१७ ते २०२१ या कालावधीतही तिने विविध स्पर्धांमध्ये प्रावीण्य मिळविले होते. सातत्यपूर्ण सराव, मेहनत आणि जिद्दीच्या बळावर तिने स्केटिंग क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
लेकीसाठी वडिलांची धडपड
तेजस्विनीच्या यशामागे तिचे वडील विनोद सोनवणे यांचा मोठा संघर्ष आहे. रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या विनोद यांनी मुलीच्या खेळासाठी आर्थिक अडचणींचा सामना केला. तिला चांगले स्केटिंग शूज घेता यावेत म्हणून घरातील सोन्याचे दागिने विकावे लागले. बाहेरगावी स्पर्धांसाठी जाण्याकरिता प्रवासखर्चाची जुळवाजुळव करताना उधार-उसनवारीही करावी लागली. मात्र, मुलीने मोठे व्हावे आणि जागतिक पातळीवर देशाचे नाव उज्ज्वल करावे, ही त्यांची इच्छा कायम राहिली.
अभ्यासाला प्राधान्य देण्याचा सल्ला देणारे वडील आज मुलीच्या सरावासाठी स्वतः पुढाकार घेतात. दररोज सकाळी रिक्षा घेऊन कामासाठी बाहेर पडणारे विनोद सायंकाळी तेजस्विनीला सरावासाठी एकलव्य मैदानावर घेऊन जातात. मुलीच्या प्रगतीसाठी त्यांची सुरू असलेली धडपड तिच्या यशामागील प्रेरणादायी बाजू ठरली आहे.
प्रशिक्षकांकडूनही मोलाची साथ
तेजस्विनीची मेहनत आणि तिच्या वडिलांचा संघर्ष लक्षात घेऊन तिला प्रशिक्षणासाठी शुल्क आकारले जात नसल्याची माहिती प्रशिक्षक डॉ. रणजित पाटील यांनी दिली. आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असतानाही तेजस्विनीने सरावात सातत्य ठेवले. तिच्या जिद्दीला प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि वडिलांच्या पाठबळाची जोड मिळाली.
दिल्लीत ‘स्वर्ण भारत’ पुरस्काराने गौरव
तेजस्विनीच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीची दखल घेत गेल्या जून महिन्यात दिल्लीत इंडिया प्राऊड बुक ऑफ रेकॉर्डच्या वतीने तिला ‘स्वर्ण भारत’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रेमानंद महाराज आणि डॉ. वैष्णवी नांदगिरी यांच्या हस्ते तिचा सन्मान करण्यात आला. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत तिने मिळविलेले यश जळगावच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानास्पद ठरत आहे.
रिक्षाचालक वडिलांनी लेकीच्या स्वप्नांसाठी केलेला त्याग आणि तेजस्विनीने आपल्या मेहनतीने मिळविलेले यश अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. आता आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी कामगिरी करण्याचे तिचे स्वप्न पूर्ण व्हावे, यासाठी सोनवणे कुटुंबाची धडपड सुरू आहे.









