पोलिसांची धडक कारवाई!; दोन दिवसांत वाळू चोरीप्रकरणी ११ गुन्हे दाखल; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त
जळगाव (प्रतिनिधी) – नदीपात्रातील पाण्याची पातळी कमी होऊ लागल्याने जळगाव जिल्ह्यात वाळूचोरी करणारे सक्रिय होण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, पोलिसांनी अत्यंत सतर्कता बाळगत अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे.

गेल्या दोन दिवसांत पोलिसांनी वाळूसंदर्भात तब्बल ११ गुन्हे दाखल करत विविध ठिकाणी लाखो रुपयांपासून कोट्यवधी रुपयांपर्यंतचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या कारवाईत भडगाव तालुक्यातील वाक येथे दोन कोटी रुपयांचा, तसेच याच ठिकाणी अन्य एका कारवाईत ४४ लाख रुपयांचा वाळूसंबंधित मुद्देमाल जप्त करण्यात आला. कासोदा येथे जानफळ परिसरात नऊ लाख रुपयांचा, तर उतराण येथे तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जळगाव तालुका पोलिसांनी भोकर परिसरात सलग कारवाया करत २० ते २५ लाखापर्यंत तसेच एरंडोल पोलिसांनी रावंजे येथे दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
नदीपात्रातील पाणी कमी होताच अवैध वाळू उपसा वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी सतर्कता वाढवली आहे. वाळूचोरीला आळा घालण्यासाठी विविध ठिकाणी कारवाया सुरू असून, अवैध वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. या सलग कारवायांमुळे वाळूचोरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.









