मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या बायपासच्या बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
जळगाव (प्रतिनिधी) : पाळधी गावाजवळील पाळधी-तरसोद बायपासवरील रेल्वे उड्डाणपुलाला जोडणाऱ्या रस्त्याचा भराव खचल्याने भीषण दुर्घटना घडली. रस्त्याचा काही भाग खचून त्यासह क्रेन मशीन थेट उड्डाणपुलावरून खाली कोसळली. या दुर्घटनेत मधुकर धनराज पाटील यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या बायपासच्या बांधकामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

पाळधी-तरसोद बायपासवरील रेल्वे उड्डाणपुलाला जोडणाऱ्या रस्त्याचा भराव खचल्याने रस्त्याचा काही भाग कोसळला. यासोबतच पुलाच्या बाजूला असलेल्या सिमेंटच्या सुरक्षा प्लेट्सही खाली पडल्या. याच दुर्घटनेत क्रेन मशीन थेट पुलावरून खाली कोसळल्याने मधुकर धनराज पाटील यांना आपला जीव गमवावा लागला. राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या महत्त्वाच्या बायपासवर अशा प्रकारची दुर्घटना घडल्याने रस्ते बांधकामाच्या दर्जाबाबत आणि सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
विशेष म्हणजे, यापूर्वी आसोदा गावाजवळील रेल्वे उड्डाणपुलाच्या एका बाजूचा भराव कोसळण्याची घटना घडली होती. त्या ठिकाणी अद्याप दुरुस्तीचे काम सुरू आहे. यानंतर आता पाळधी परिसरातही भराव खचून भीषण दुर्घटना घडल्याने संबंधित यंत्रणेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एकापाठोपाठ घडणाऱ्या या घटनांमुळे बायपासच्या बांधकामाची गुणवत्ता, वापरण्यात आलेले साहित्य आणि कामाच्या तांत्रिक दर्जाची सखोल तपासणी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्या संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करावी, तसेच संपूर्ण बायपासच्या बांधकामाचे स्वतंत्र तांत्रिक परीक्षण करून रस्ते व पुलांच्या सुरक्षिततेची खात्री करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. महामार्गावरील अशा दुर्घटनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
दरम्यान, या दुर्घटनेची गंभीर दखल घेत पालकमंत्री गुलाबराव पाटील उद्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत घटनास्थळाची पाहणी करणार आहेत. या पाहणीत भराव खचण्यामागील कारणांचा आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे. आता या पाहणीनंतर संबंधित यंत्रणा कोणती भूमिका घेते, बांधकामाच्या गुणवत्तेची चौकशी होते का आणि दोषींवर काय कारवाई केली जाते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.









