जळगावच्या जुन्या बसस्थानकाजवळ मध्यरात्रीची घटना
जळगाव (प्रतिनिधी) – प्रेमसंबंधाला विरोध असल्याच्या कारणावरून एका ३५ वर्षीय महिलेवर गोळीबार करण्यात आल्याची घटना दसऱ्याच्या दिवशी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास जुन्या बसस्थानकाजवळ घडली. या गोळीबारात संगीता बुधा बारेला (वय ३५, रा. गोपाळपुरा) ही महिला जखमी झाली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अनिकेत सपकाळे आणि त्याच्यासोबत असलेल्या एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पिंप्राळा परिसरातील सोनी नगर येथील रोहन मधुकर सपकाळे (वय ३०) आणि संगीता बारेला यांच्यात प्रेमसंबंध आहेत. संगीताच्या पतीचे निधन झाले असून, रोहन सोबतच्या तिच्या संबंधांना कुटुंबीयांचा विरोध असल्याची माहिती समोर आली आहे.
दसऱ्याच्या रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास रोहन हा संगीताला जुन्या बसस्थानकाजवळून सोबत घेऊन जात असताना अनिकेत सपकाळे आणि त्याच्यासोबत असलेल्या एका व्यक्तीने तिच्यावर गोळीबार केल्याचा आरोप केला आहे. या घटनेत संगीताच्या गुडघ्याला गोळी लागल्याने ती जखमी झाली.
घटनेनंतर रोहनने संगीताला उपचारासाठी शासकीय महाविद्यालयात रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, गोळीबारातील संशयित अनिकेत हा रोहनचा भाऊ असल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, शहर पोलीस पुढील तपास करीत आहेत.








