ट्रक चालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
जळगाव (प्रतिनिधी) :- जळगाव तालुक्यातील बांभोरी परिसरातील गिरणा नदी पुलाजवळ झालेल्या भीषण अपघातात मोटारसायकलवरील तिघांचा मृत्यू झाल्याची घटना दि. १८ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


या अपघातात पंकज प्रकाश चौधरी (वय २६), हरीष हिंमत चौधरी (वय २९) आणि रविंद्र अरुण चौधरी (वय ३२, रा. सुरखेडा, ता. धरणगाव, जि. जळगाव) यांचा मृत्यू झाला.
पोलिसांच्या नोंदीनुसार, संबंधित वाहनचालकाने वाहन वेगाने चालविताना रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केले आणि निष्काळजीपणामुळे हा अपघात घडला. या दुर्घटनेत तिघांना जीव गमवावा लागल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल
या प्रकरणी ट्रक चालक अनुपम प्रजापती (रा.उत्तरप्रदेश) याच्याविरुद्ध जळगाव तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांसह मोटार वाहन अधिनियमानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नयन छबुलाल पाटील करीत आहेत.








