धरणगाव ( प्रतिनिधी ) – येथील मातोश्री नगर परिसरामध्ये अज्ञात चोरट्यांनी एका बंद घराला लक्ष्य करत घरफोडी केल्याची घटना समोर आली आहे. या चोरीत चोरट्यांनी घरातून ५४ हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली असून या प्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मातोश्री नगर, धरणगाव येथील रहिवासी गणेश विठ्ठल बच्छाव (वय ३८, व्यवसाय- नोकरी) यांच्या राहत्या घरातून दिनांक १४ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या रात्री ८:०० वाजेपासून ते १५ ऑक्टोबर २०२६ च्या सकाळी ८:०० वाजेदरम्यान अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला. चोरट्याने घरातील ५०० रुपये दराच्या नोटा असलेली ५०,००० रुपयांची रोकड तसेच मुलीच्या गल्ल्यातील १००, ५०, २० आणि १० रुपयांच्या नोटांचे ४,००० रुपये, अशी एकूण ५४,००० रुपयांची रोख रक्कम चोरून नेली.
घटनेनंतर फिर्यादी गणेश बच्छाव यांनी धरणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५(अ) आणि ३३१(४) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक उमाकांत गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली असून पोलीस नाईक ज्ञानेश्वर कोळी (ब.नं. ३१३४) या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.








