मृतदेह महामार्गावरील वॉटर पार्कजवळ फेकला, दोघांना अटक तर तिसरा संशयित फरार
भुसावळ (प्रतिनिधी) : उसनवारीच्या पैशांच्या व्यवहारातून शहरातील एका २१ वर्षीय उच्चशिक्षित तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना गुरुवार, ८ ऑक्टोबर रोजी उघडकीस आल्याने भुसावळ शहरात खळबळ उडाली आहे. भूषण उल्हास व्हावळे (वय २१, रा. गोपाळ नगर, डी.एल. हिंदी हायस्कूलमागे, भुसावळ) असे मृत तरुणाचे नाव आहे. खुनाचे प्रकरण उघडकीस येऊ नये, या उद्देशाने संशयितांनी त्याचा मृतदेह महामार्गावरील वॉटर पार्कजवळील सर्व्हिस रोडवर टाकल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. तांत्रिक तपासाच्या आधारे भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा करीत दोन संशयितांना अटक केली असून तिसरा संशयित रफिक मेमन ऊर्फ गुड्डू हा फरार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भूषण व्हावळे याला संशयित आरोपींनी साक्री फाटा परिसरातील संजय दत्तू आवटे याच्या फार्म हाऊसवर बोलावून नेले होते. उसनवारीचे पैसे परत न केल्याच्या कारणावरून तेथे भूषण आणि संशयितांमध्ये वाद झाला. या वादातून आरोपींनी कोणत्यातरी हत्याराने भूषण याच्यावर मारहाण करून त्याला गंभीर जखमी केले. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. त्यानंतर खुनाचे प्रकरण उघडकीस येऊ नये, या उद्देशाने मृतदेह महामार्गावरील वॉटर पार्कजवळील सर्व्हिस रोडवर फेकून दिल्याचे तपासात निष्पन्न झाले.
या प्रकरणी मृत भूषणचा भाऊ विशाल उल्हास व्हावळे याने भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संजय दत्तू आवटे, प्रमोद बलराम लाहोरीया (दोघेही रा. भुसावळ) आणि रफिक मेमन ऊर्फ गुड्डू यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोघांना अटक; तिसऱ्या संशयिताचा शोध सुरू
घटनेनंतर पोलिसांनी तांत्रिक तपास आणि उपलब्ध माहितीच्या आधारे संशयितांचा शोध सुरू केला. संशयित पसार होण्याच्या प्रयत्नात असताना भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने संजय दत्तू आवटे आणि प्रमोद बलराम लाहोरीया या दोघांना अटक केली. तर तिसरा संशयित रफिक मेमन ऊर्फ गुड्डू याचा शोध सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. खुनाच्या घटनेनंतर अवघ्या दोन तासांत दोघांना अटक करण्यात पोलिसांना यश आले.
जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गवित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक राहुल तायडे, सहायक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील, पोलीस उपनिरीक्षक मो. अली सैय्यद तसेच डी.बी. पथकातील हवालदार कांतीलाल केदारे, योगेश माळी, भूषण चौधरी, प्रशांत सोनार, सचिन चौधरी, महेंद्र पाटील, चंद्रकांत रायपूरकर, जावेद शहा, जीवन कापडे आणि अशोक बाविस्कर आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. या घटनेतील फरार संशयिताचा शोध सुरू असून पुढील तपास भुसावळ बाजारपेठ पोलीस करीत आहेत.








