अंडर-१७ बॅडमिंटन संघ तालुकास्तरावर विजेता जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी संघाची निवड
भुसावळ : डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, भुसावळ अंडर-१७ मुलांच्या बॅडमिंटन संघाने तालुकास्तरीय आंतरशालेय बॅडमिंटन स्पर्धेत दमदार कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावत विजेतेपदावर आपले नाव कोरले. या यशामुळे संघाची आगामी जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड झाली असून ही स्पर्धा जळगाव येथे होणार आहे.

तापी पब्लिक स्कूल, भुसावळ येथे तालुकास्तरीय आंतरशालेय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विविध शाळांच्या संघांनी सहभाग घेतला होता. डॉ.उल्हास पाटील इग्लिश मिडियम स्कुल भुसावळच्या अंडर-१७ मुलांच्या संघाने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले. उत्कृष्ट सर्व्हिस, वेगवान स्मॅश, अचूक शॉट्स तसेच प्रभावी बचावाच्या जोरावर संघाने प्रतिस्पर्धी संघांवर मात करत प्रथम क्रमांक मिळविला.या विजयामुळे डॉ.उल्हास पाटील इग्लिश मिडियम स्कुल भुसावळच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असून आता संघ जळगाव येथे होणार्या जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत भुसावळ तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तसेच शाळेच्या क्रीडा विभागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ. उल्हास पाटील, डॉ. सौ. वर्षा पाटील, डॉ. सौ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील, डॉ. अनिकेत पाटील तसेच मुख्याध्यापिका सौ. अनघा पाटील यांनी विजयी खेळाडू, प्रशिक्षक आणि संपूर्ण संघाचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी मिळविलेले हे यश त्यांच्या मेहनतीचे, चिकाटीचे आणि शिस्तबद्ध सरावाचे फलित असल्याचे त्यांनी सांगितले.क्रीडा क्षेत्रात विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या गुणवत्तेला योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे ही शाळेची सातत्यपूर्ण भूमिका आहे. जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या संघाने यापुढेही अशीच उत्कृष्ट कामगिरी करावी, अशा शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या. अंडर-१७ बॅडमिंटन संघाच्या या यशाबद्दल विद्यार्थी, पालक, शिक्षक व क्रीडाप्रेमींमधून कौतुक होत आहे.








