जळगाव, : गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल येथे राष्ट्रीय सेवा योजना युनिटच्या वतीने रक्तदान दिनानिमित्त रक्तदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

विद्यार्थ्यांमध्ये स्वैच्छिक रक्तदानाबाबत जागरूकता निर्माण करणे आणि रक्तदानाचे सामाजिक महत्त्व पटवून देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. स्वैच्छिक रक्तदानाचे महत्त्व,आवश्यक पात्रता व आरोग्यविषयक निकष, रक्तदानाचे फायदे, गैरसमज तसेच अपघातग्रस्त,शस्त्रक्रिया होणारे, आपत्कालीन परिस्थितीतील तसेच विविध वैद्यकीय उपचार घेणार्या रुग्णांसाठी वेळेवर उपलब्ध होणार्या रक्ताचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.विद्यार्थ्यांसोबत संवादात्मक चर्चा घेण्यात आली.
विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रक्तदानासंदर्भातील विविध प्रश्न उपस्थित केले.‘रक्तदान ही केवळ वैद्यकीय गरज नसून मानवतेची सेवा आणि सामाजिक बांधिलकी आहे’, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. तसेच स्वतः रक्तदान करण्यासोबतच पात्र कुटुंबीय, मित्र आणि समाजातील नागरिकांना स्वैच्छिक रक्तदानासाठी प्रेरित करण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.जनजागृती कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये रक्तदानाबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होऊन सामाजिक जबाबदारीची भावना अधिक दृढ झाली.









