पारोळा शहरातील घटना
पारोळा (प्रतिनिधी) – खोट्या सह्या करून तसेच बँक डिटेल्स, पेमेंट स्लिप व इतर कागदपत्रांच्या झेरॉक्सचा गैरवापर करीत तब्बल १७ लाख ६० हजार ८३४ रुपयांचे जेएम फायनान्सचे होमलोन घेऊन घर खरेदी केल्याचा आरोप करत दोन जणांविरुद्ध पारोळा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


या प्रकरणी कमलेश रविंद्र सिरसाठ आणि छायाबाई रविंद्र सिरसाठ, दोघे रा. प्लॉट नं. ३२, बालाजीनगर, नवागाव, दिंडोली, सुरत शहर, यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर २०२३ ते दि. ३१ जानेवारी २०२४ दरम्यान पारोळा शहरातील बालाजी शाळेमागे, गजानन सिटी परिसरात ही फसवणूक झाल्याचा आरोप आहे.
तक्रारदाराच्या सासू छायाबाई रविंद्र सिरसाठ व शालक कमलेश रविंद्र सिरसाठ यांनी तक्रारदाराला कोणतीही माहिती न देता त्याच्या बँक डिटेल्स, पेमेंट स्लिप तसेच इतर कागदपत्रांच्या झेरॉक्स मिळविल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
त्यानंतर तक्रारदाराच्या खोट्या सह्या करून त्याला गैरंटर ठेवत जेएम फायनान्सकडून १७ लाख ६० हजार ८३४ रुपयांचे होमलोन घेण्यात आले. या कर्जाच्या रकमेतून पारोळा बायपासजवळील गट क्रमांक ७५७/१/ए, प्लॉट क्रमांक ४७, साऊथ पार्ट, साऊथ साईड, ब्लॉक क्रमांक बी/८ येथील प्रॉपर्टी खरेदी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
मात्र, सदर कर्जाचे हप्ते न भरल्याने तक्रारदाराच्या पतपत्रिकेवर तसेच सिबिल स्कोअरवर मोठा नकारात्मक परिणाम झाला. त्यामुळे तक्रारदाराला नवीन कर्ज मिळण्यात अडचणी निर्माण झाल्याने त्याचे आर्थिक नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी तक्रारदाराने कमलेश रविंद्र सिरसाठ व छायाबाई रविंद्र सिरसाठ यांच्याविरुद्ध कायदेशीर तक्रार दिली आहे. त्यानुसार पारोळा पोलिस ठाण्यात सी.सी.टी.एन.एस. गुन्हा रजिस्टर क्रमांक ३६०/२०२६, भादंवि कलम ४२०, ४६५, ४६८, ४७१, ३४ अन्वये फसवणूक व बनावट कागदपत्रांशी संबंधित गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि योगेश महाजन, पारोळा पोलिस ठाणे, करीत आहेत.








