ढोल-ताशांच्या गजरात आणि डीजेच्या तालावर गणेशभक्तांचा उत्साह; नगरपरिषद व पोलीस प्रशासनाच्या नियोजनामुळे विसर्जन शांततेत
भडगाव ( प्रतिनिधी ) – बारा दिवसांच्या भक्तिमय सहवासानंतर लाडक्या गणरायाला भडगाव शहरात जड अंतःकरणाने निरोप देण्यात आला. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात, ढोल-ताशांच्या गजरात आणि डीजेच्या तालावर थिरकत गणेशभक्तांनी बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला. यावेळी गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर भडगाव नगरपरिषद प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने केलेल्या नियोजनामुळे शहरात विसर्जन सोहळा शांततेत पार पडला. भडगाव नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी स्वालिया मालगावे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील सार्वजनिक तसेच घरगुती गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. नागरिकांना विसर्जनादरम्यान कोणत्याही प्रकारची अडचण किंवा दुर्घटना उद्भवू नये, यासाठी नगरपरिषद प्रशासनाने शहरातील गिरणा पंपिंग परिसर, तळणी भाग, शनी चौक आणि पेठ भाग या ठिकाणी मूर्ती संकलन केंद्रे उभारली होती.
या संकलन केंद्रांवर नागरिकांकडून गणेशमूर्ती स्वीकारून नगरपरिषदेच्या वाहनांद्वारे त्या विसर्जनासाठी डम्पिंग ग्राउंड येथे नेण्यात आल्या. या व्यवस्थेमुळे नागरिकांना विसर्जनासाठी सोयीस्कर पर्याय उपलब्ध झाला. तसेच विसर्जन प्रक्रियेचे नियोजनबद्ध व्यवस्थापन करण्यास मदत झाली.
संकलन केंद्रांवर नगरपरिषद कर्मचाऱ्यांची धावपळ
गणेशमूर्ती संकलन व्यवस्थेसाठी नगरपरिषदेचे आरोग्य निरीक्षक निशा लोट, कर निरीक्षक शुभांगी पाटील, आशुतोष राजपूत, विशाल महाजन, पाणीपुरवठा विभागाचे लिपिक कमलाकर देशमुख यांच्यासह कर्मचाऱ्यांनी विविध केंद्रांवर जबाबदारी सांभाळली. नागरिकांकडून मूर्ती स्वीकारणे, त्यांची वाहतूक करणे आणि विसर्जनासाठी आवश्यक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.
विद्युत रोषणाईसाठी कर्मचाऱ्यांची विशेष दक्षता
विसर्जन सोहळ्यादरम्यान संकलन केंद्रांवर रात्री आठ वाजेपर्यंत विद्युत रोषणाईची व्यवस्था करण्यात आली होती. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच विसर्जन प्रक्रियेत अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी विद्युत अभियंता लखन गोडसरे, सुनील पवार, अतुल माळी, यांनी कर्मचाऱ्यांसह प्रत्यक्ष उपस्थित राहून विद्युत व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न केले.
पोलीस प्रशासनाचा कडेकोट बंदोबस्त
गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी भडगाव पोलीस प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली होती. पोलीस निरीक्षक महेश टाक यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात होते. मिरवणुकीदरम्यान परिस्थितीवर लक्ष ठेवत विसर्जन सोहळा शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज होते.
एकीकडे ढोल-ताशांचा निनाद, डीजेच्या तालावर तरुणाईचा उत्साह, तर दुसरीकडे बाप्पाला निरोप देताना भाविकांच्या डोळ्यांत दाटलेले अश्रू, असे भावपूर्ण वातावरण शहरात पाहायला मिळाले. बारा दिवसांच्या गणेशोत्सवानंतर गणरायाला निरोप देताना भक्तांनी पुढील वर्षी लवकर येण्याचे साकडे घातले.
नगरपरिषद प्रशासनाचे नियोजन, कर्मचाऱ्यांचे सहकार्य आणि पोलीस प्रशासनाच्या बंदोबस्तामुळे भडगाव शहरातील गणेश विसर्जन सोहळा शांततेत पार पडला.











