अजिंठा चौफुली परिसरातून चोरीस गेलेली स्प्लेंडर प्लस हस्तगत; संशयित आरोपीला अटक, तीन दिवसांची पोलीस कोठडी
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील अजिंठा चौफुली परिसरातील इदगाह कॉम्प्लेक्ससमोरून चोरीस गेलेली मोटारसायकल एमआयडीसी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत हस्तगत केली आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी तुलसीराम काल्यांसिंग कास्दे (वय २८) याला पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.


जळगाव शहरातील शेरा चौक, रझा कॉलनी, मेहरूण येथील रहिवासी रमजान खान बाबु खान यांच्या मालकीची काळ्या रंगाची स्प्लेंडर प्लस मोटारसायकल (क्र. MH-19 DY 4874) चोरीस गेली होती. 12 सप्टेंबर 2026 रोजी रात्री सुमारे 9 वाजता फिर्यादी यांनी अजिंठा चौफुली परिसरातील इदगाह कॉम्प्लेक्ससमोर दुचाकी पार्क करून वैयक्तिक कामासाठी गेले होते. काम आटोपून परतल्यानंतर पार्क केलेल्या ठिकाणी मोटारसायकल आढळून आली नाही. याप्रकरणी त्यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७३८/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
चोरीस गेलेल्या मोटारसायकलीचा शोध घेण्यासाठी एमआयडीसी पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणासह गोपनीय बातमीदारांच्या माध्यमातून तपास सुरू केला. तपासादरम्यान मोटारसायकल चोरी करणाऱ्या संशयित आरोपीची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी २३ सप्टेंबर २०२६ रोजी तुलसीराम काल्यांसिंग कास्दे याला ताब्यात घेत चौकशी केली. चौकशीत त्याने आपले नाव तुलसीराम काल्यांसिंग कास्दे, वय २८ वर्षे, रा. ८३ झाकस, ता. भैंसदेही, जि. बैतूल, मध्य प्रदेश असे सांगितले. सध्या तो फ्लॉट नं. ३४, गट नं. १६७/१, सुप्रीम कॉलनी, शारदा कॉलनी, शारदा शाळेजवळ, जळगाव येथे राहत असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
पोलिसांनी आरोपीकडून चोरीस गेलेली स्प्लेंडर प्लस मोटारसायकल क्रमांक MH-19 DY 4874 हस्तगत केली आहे. आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक प्रदीप चौधरी करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.









