८ लाख ५२ हजारांचा मुद्देमाल जप्त ; राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई
शिरपूर (प्रतिनिधी) – राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने शिरपूर तालुक्यातील दुर्बड्या शिवारात छापा टाकून बनावट देशी दारू निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त केला. या कारवाईत तयार बनावट दारू, स्पिरीट, हजारो रिकाम्या बाटल्या, रिकामे खोके तसेच ट्रॅक्टर-ट्रॉलीसह एकूण ८ लाख ५२ हजार ७५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी विजय रमेश पावरा याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त राजेश देशमुख, सहआयुक्त (अंमलबजावणी व दक्षता) प्रसाद सुर्वे, नाशिक विभागाच्या विभागीय उपआयुक्त यू. आर. वर्मा आणि धुळे अधीक्षक स्वाती काकडे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक मुकेश दिनकर पाटील, सीमा तपासणी नाका हाडाखेड, ता. शिरपूर, जि. धुळे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती. दुर्बड्या शिवारात विजय रमेश पावरा याच्या राहत्या घराशेजारील पत्रीशेडमध्ये बनावट देशी दारू तयार केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर २५ सप्टेंबर २०२६ रोजी पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला.
या छाप्यात बनावट देशी दारूच्या ९० मिली क्षमतेच्या ७० हजार रिकाम्या बाटल्या, तयार देशी दारू ब्लेंड १७५ लिटर, स्पिरीटने भरलेला २५० मिली क्षमतेचा प्लास्टिक ड्रम, देशी दारू भरण्यासाठी १८० मिली क्षमतेच्या १ हजार २५० रिकाम्या काचेच्या बाटल्या, देशी दारू नावाचे ७५० रिकामे खोके, तसेच क्रमांक नसलेला FARMATRAC POWERMAX कंपनीचा ट्रॅक्टर-ट्रॉली आणि बनावट मद्यनिर्मितीसाठी वापरले जाणारे इतर साहित्य असा एकूण ८ लाख ५२ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी बनावट देशी दारू तयार केल्याप्रकरणी विजय रमेश पावरा याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या कलम ६५ (ब), (क), (ड), (ई), (फ), ८०, ८१, ८३ व १०८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या बनावट मद्यनिर्मितीसाठी साहित्य पुरविणारे तसेच या प्रकरणातील इतर साथीदारांचा शोध राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुरू आहे.
ही कारवाई दुय्यम निरीक्षक मुकेश पाटील, दुय्यम निरीक्षक एस. एस. निकम, निरीक्षक देविदास नेहूल, जवान दारासिंग पावरा, गोरख पाटील, केतन जाधव, मधुकर मस्के, काशिनाथ गोसावी, प्रतीकेश भामरे, प्रशांत बोरसे, वाहनचालक रवींद्र देसले आणि विजय नाहीदे यांच्या पथकाने केली.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास धुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्वाती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक मुकेश पाटील करीत आहेत.









