आजीच्या निधनानंतर गावाला गेलेल्या कुटुंबाच्या घरावर चोरट्यांचा डल्ला; सोन्या-चांदीचे दागिने चोरीस
अमळनेर (प्रतिनिधी) :- शहरातील मुंदडा नगर भागात बंद घराचे कुलूप व कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करत तब्बल ७० हजार २०० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गणेश रामभाऊ पाटील (वय ४६, व्यवसाय शेती, रा. मुंदडा नगर-१, सोहम नगर, अथर्व बंग्लोजजवळ, अमळनेर) यांच्या आजीचे निधन झाल्याने ते १२ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास आपल्या घराला कुलूप लावून मूळ गावी गेले होते. दुसऱ्या दिवशी १३ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास ते घरी परतले असता घराच्या दरवाजाचे कुलूप व कडीकोयंडा तुटलेल्या अवस्थेत आढळून आला.
घरात प्रवेश करून पाहणी केली असता कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने चोरीस गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. चोरीस गेलेल्या ऐवजामध्ये २६ हजार रुपये किमतीची १३ ग्रॅम वजनाची सोन्याची माळ, २४ हजार रुपये किमतीची १२ ग्रॅम वजनाची सोन्याची माळ, १६ हजार रुपये किमतीची ८ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, तसेच २ हजार ५०० रुपये किमतीचे १ भार वजनाचे ५ चांदीचे देवाचे शिक्के आणि १ हजार ७०० रुपये किमतीचे ३.५ भार वजनाचे चांदीचे जोडवे, असा एकूण ७० हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीस गेला आहे.
फिर्यादी व साक्षीदार अनिल आत्माराम महाजन यांच्या घराच्या कुलूप-कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला आणि त्यांच्या संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने घरफोडी करून दागिने चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी अमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४७८/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३३१(३), ३३१(४), ३०५(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउपनि शरद काकुळीज करीत आहेत. अज्ञात आरोपीचा अद्याप शोध लागलेला नाही.









