डीवायएसपी सुनील पाटील व प्रभारी एपीआय प्रशांत कंधारे यांच्या पथकाची कारवाई
अडावद (प्रतिनिधी) -: अडावद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील देवझिरी गावालगतच्या शेतशिवारात तुरीच्या पिकामध्ये गांजाची लागवड केल्याचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला आहे. डीवायएसपी सुनील पाटील व अडावद पोलिस ठाण्याचे प्रभारी एपीआय प्रशांत कंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या कारवाईत गांजाची तब्बल १७५ झाडे जप्त करण्यात आली असून, या प्रकरणी देवसिंह बरेला याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.



देवझिरी गावातील शेतशिवारात तुरीच्या पिकाच्या आड गांजाची लागवड करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस पथकाने संबंधित शेतात कारवाई करत पाहणी केली असता तुरीच्या पिकामध्ये गांजाची झाडे आढळून आली. पोलिसांनी पंचनामा करून एकूण १७५ गांजाची झाडे जप्त केली.
विशेष म्हणजे, कारवाई करण्यात आलेले शेतशिवार मध्य प्रदेशच्या सीमेच्या जवळ असल्याने या घटनेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी देवसिंह बरेला याला ताब्यात घेतले असून, जप्त करण्यात आलेल्या गांजाच्या झाडांचे वजन व किंमत निश्चित करण्याची प्रक्रिया तसेच पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
गांजाची लागवड नेमकी किती क्षेत्रात करण्यात आली होती, जप्त मुद्देमालाची अंदाजे किंमत किती आहे आणि या प्रकारामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास अडावद पोलिसांकडून सुरू आहे.








