जळगाव (प्रतिनिधी) – जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलालजी जैन यांच्या पत्नी स्व. सौ. कांताबाई जैन यांच्या २१ व्या स्मृतिदिनानिमित्त ‘रक्तदान हाच खरा आत्मसन्मान’ या उपक्रमाद्वारे परिवारातील सदस्य व कंपनीच्या सहकाऱ्यांनी स्वयंस्फूर्त सहभाग घेत रक्तदानाचा पायंडा कायम ठेवला. कंपनीतील सर्व सहकाऱ्यांशी अत्यंत जिव्हाळ्याने स्नेह ठेवणाऱ्या कांताईंच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल सर्वांच्या मनात निःसीम आदर आहे. या कृतज्ञतेतून उत्स्फूर्तपणे यावर्षी ४८० सहकाऱ्यांनी रक्तदान केले.

समाजातील गरजू व्यक्तींना रक्ताचा तुटवडा भासू नये, या उद्देशाने दरवर्षी त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ६ सप्टेंबर रोजी कंपनीत भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले जाते. अशाच पद्धतीचे रक्तदान शिबिर स्व. हिरालालजी जैन यांच्या स्मृतिदिनी ९ मार्चला देखील करण्यात येते. यातदेखील सहकारी उत्स्फूर्त सहभागी होतात. सकाळी ०९.०० ते सायंकाळी ०७.०० पर्यंत चाललेले हे महारक्तदान शिबिराचे आयोजन भारतभरातील कंपनीच्या प्रमुख आस्थापनांमध्ये करण्यात आले होते. यात टी.सी. पार्क व जैन प्लास्टिक पार्क येथे ३०७, जैन ॲग्री पार्क, एनर्जी पार्क, फूड पार्क, डिव्हाईन पार्क मिळून १४९, चित्तूर ०९, उदमलपेठ ०७, अलवर ०२, हैदराबाद ०६ अशा ४८० सहकाऱ्यांनी रक्तदान केले.
जैन फूड पार्क येथील ॲडमिन ऑफिसच्या सभागृहात व प्लास्टिक पार्क येथे डेमो बिल्डिंग हॉलमध्ये स्व. कांताबाई जैन यांच्या प्रतिमेला श्रद्धांजली अर्पण करून रक्तदान शिबिराचा शुभारंभ झाला.
प्लास्टिक पार्क येथे रक्तदान शिबिराचे उद्घाटन मिलिंद खारुल, जनमेजय नेमाडे, किशोर सोनार, सी. एस. नाईक तसेच सिव्हिल विभागाच्या डॉ. श्वेता वळवी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. या रक्तदान शिबिरासाठी रेड क्रॉस रक्तपेढीने रक्तसंकलनाची जबाबदारी सांभाळली. त्यात डॉ. शंकरलाल सोनवणे, डॉ. उल्हास तासखेडकर, मंगलाबाई ठोमरे यांनी रक्तसंकलनाचे कार्य केले.
जैन फूड पार्क येथे सौ. ज्योती जैन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर त्यांनी रक्तदान केले. यावेळी डॉ. कल्याणी नागुलकर आणि वरिष्ठ सहकारी सुनील गुप्ता, संजय पारख, जी. आर. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
रक्तसंकलनासाठी जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, इंडियन रेडक्रॉस सोसायटी, माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढी आदी संस्थांनी रक्तसंकलन केले.
सहकाऱ्यांची कंपनीप्रती असलेली आस्था व स्व. कांताईंच्याप्रती असलेली श्रद्धा याचे हे महारक्तदान शिबिर द्योतक आहे. सहकाऱ्यांचे यासाठी असलेले योगदान कंपनीची सामाजिक बांधिलकी दृढ करणारे आहे, अशा शब्दांत जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.











