वृंदावन वेशभूषा व सांस्कृतिक सादरीकरणातून कृष्णजन्माष्टमीचा उत्साह
जळगाव ( प्रतिनिधी ) – अनुभूती इंग्लिश मिडियम स्कूलच्या प्रायमरी विभागात जन्माष्टमी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी आकर्षक वेशभूषेत विविध सांस्कृतिक सादरीकरणे करून उपस्थितांची मने जिंकली. इयत्ता पाचवीतील विद्यार्थिनी तनुश्री डांगे हिनेही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत दहीहंडी फोडली.
बालगोपालांनी श्रीकृष्ण, राधा, गोप-गोपिका यांच्या वेशभूषेत साकारलेली पात्रे आणि त्यांच्या मनमोहक सादरीकरणातून जणू वृंदावनाचे दर्शन घडविले. विद्यार्थ्यांच्या निरागस अभिनयातून कान्हाच्या बाललीलांची आठवण झाली. पारंपरिक वेशभूषा, भक्तिमय वातावरण आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे शाळेचा परिसर कृष्णमय झाला. या विद्यार्थ्यांचे
कौतुक जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी केले. सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर सहकाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.











