अकुलखेडा प्राथमिक शाळेत घरफोडी; ७० हजार ६०० रुपयांचे शैक्षणिक साहित्य लंपास

कार्यालय व डिजिटल रूमचे कुलूप तोडून चोरट्यांचा प्रवेश; एलईडी, यूपीएस, स्पीकर, प्रोजेक्टर व सीसीटीव्ही कॅमेरे चोरीला
चोपडा | प्रतिनिधी : चोपडा तालुक्यातील अकुलखेडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून ७० हजार ६०० रुपये किमतीचे शालेय व इलेक्ट्रॉनिक साहित्य चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीमती उज्वला धर्मराज चव्हाण (वय ५८, नोकरी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अकुलखेडा येथील प्रभारी मुख्याध्यापिका, रा. गणेश कॉलनी, चोपडा) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
दि. २५ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजेपासून ते २९ ऑगस्ट रोजी सकाळी ७.३० वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने अकलखेडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या कार्यालय व डिजिटल रूमच्या दरवाजाचे कडी-कोंडा व कुलूप तोडून आत प्रवेश केला.
चोरट्याने शाळेतील दोन एलईडी लाईट, एक यूपीएस, एक स्पीकर सिस्टीम, प्रोजेक्टरची एक व्हाईट स्क्रीन, दोन सीसीटीव्ही कॅमेरे तसेच स्टेशनरी साहित्य असा एकूण ७० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
घटना लक्षात आल्यानंतर शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिकेने चोपडा शहर पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार चोपडा शहर पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक ३५९/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(अ), ३३१(२), ३३१(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचा पुढील तपास पोहेकॉ/८७० किरण रविंद्र शिंपी करीत आहेत. पोलिसांकडून अज्ञात चोरट्याचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे.









