शाहूनगरातील चोरीचा अवघ्या ५ तासांत छडा; तिघा संशयितांकडून १२ हजारांची रोकड जप्त

शहर पोलिसांची धडक कारवाई; सीसीटीव्ही फुटेज ठरले तपासात महत्त्वाचे
जळगाव: शाहूनगरातील शाहू कॉम्प्लेक्स परिसरात वृद्धाच्या पँटच्या खिशातून रोकड लंपास करणाऱ्या तीन संशयितांना जळगाव शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या पाच तासांत ताब्यात घेतले. संशयितांकडून १२ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली असून, यामध्ये दोन तरुणांसह एका विधी संघर्षित बालकाचा समावेश आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ ऑगस्ट रोजी दुपारी तीनच्या सुमारास अनिल राजमल कासट (वय ६२, रा. म्हाडा कॉलनी) यांच्या खिशातून अज्ञात चोरट्यांनी १२ हजार ५०० रुपये लांबवले होते. तक्रार दाखल होताच पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला. तपासात शहीदखान नजीरखान (वय २७) आणि समीर खान मजीदखान (वय ३७) यांच्यासह एका सोळा वर्षीय बालकाचा सहभाग असल्याचे उघड झाले. पथकाने गेंदालाल मिल परिसरातून तिघांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत व उपविभागीय अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने केली.









