गर्भलिंग तपासणीच्या तक्रारीनंतर जळगावातील आर्या हॉस्पिटलवर कारवाई; सोनोग्राफी मशीन सील


जळगाव: शहरातील बळीराम पेठेतील आर्या हॉस्पिटलमध्ये नियमांचे उल्लंघन करून बेकायदेशीर गर्भलिंग तपासणी केली जात असल्याच्या तक्रारीवरून जिल्हा प्रशासन आणि महापालिकेच्या आरोग्य विभागाने सोमवारी धडक कारवाई केली. तपासणीत अनेक गंभीर अनियमितता आढळून आल्याने पथकाने रुग्णालयातील सोनोग्राफी मशीन तातडीने सील केले आहे.
मिळालेली माहिती अशी की, आर्या हॉस्पिटलमध्ये गर्भलिंग तपासणीस परवानगी नसतानाही असा प्रकार सुरू असल्याची लेखी तक्रार जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याकडे प्राप्त झाली होती. त्याची तत्काळ दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष तपासणी पथक गठीत केले.
तपासणीत निष्पन्न झालेल्या गंभीर बाबी:
-
बेकायदेशीर गर्भपात: रुग्णालयाला २० आठवड्यांपर्यंतच गर्भपाताची परवानगी असताना २१ आठवड्यांपेक्षा अधिक कालावधीच्या गर्भवतींचे गर्भपात केल्याचे निदर्शनास आले.
-
नोंदवह्या गायब: रुग्णालयातील नियमित नोंदी अपूर्ण असून काही महत्त्वाचे रेकॉर्ड्स संशयास्पदरीत्या गायब असल्याचे समोर आले.
-
कायदेशीर फलक गायब: गर्भपात व गर्भलिंग तपासणीविरोधी कायद्यांचे जनजागृती फलक दर्शनी भागात लावलेले नव्हते.
-
प्रमाणपत्र नाही: सोनोग्राफी मशीनसाठी आवश्यक असलेले ‘एमआयसी’ प्रमाणपत्रही तपासणीवेळी डॉक्टर सादर करू शकले नाहीत.
संयुक्त पथकाची धाड
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. स्वप्नील सांगळे व मनपाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशांत निकुंभ यांच्यासह ८ सदस्यांच्या पथकाने ही धाड टाकून सोनोग्राफी मशीन सील केले. याप्रकरणी पुढील चौकशी सुरू आहे.









