अजिंठा चौकाजवळील ट्रान्सपोर्ट नगरातील भीषण अपघात; भुसावळकडे जात असताना घडली घटना
जळगाव ( प्रतिनिधी ) – अजिंठा चौकाजवळील ट्रान्सपोर्ट नगर परिसरात विरुद्ध दिशेने आलेल्या क्रुझर वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले. सोमवारी (२४ ऑगस्ट) सायंकाळी हा अपघात घडला.


या अपघातात वरुण सुरवाडे (रा. भुसावळ) याचा मृत्यू झाला. तर पवन अनिल अडकमोल (वय १८, रा. जुनी आरपीएफ चाळसमोर, भुसावळ) याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून नीरज रवींद्र कोचुरे (वय १८, रा. खिर्डी, ता. भुसावळ) हा किरकोळ जखमी झाला आहे. तिघेही जळगाव येथील शासकीय आयटीआयमध्ये शिक्षण घेत होते.
कॉलेज सुटल्यानंतर भुसावळकडे जात होते
सोमवारी सायंकाळी कॉलेज सुटल्यानंतर तिघेही दुचाकीवरून भुसावळकडे परतत होते. अजिंठा चौक ओलांडून ट्रान्सपोर्ट नगर परिसरात आले असता विरुद्ध दिशेने अचानक क्रुझर वाहन आल्याची माहिती आहे. यामुळे दुचाकीवरील विद्यार्थ्यांचे नियंत्रण सुटले. त्याचवेळी टँकरशीही धडक झाल्याने तिघे रस्त्यावर फेकले गेले.
जीएमसीत तरुणाचा मृत्यू
अपघातानंतर तिघांनाही तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर वरुण सुरवाडे याला मृत घोषित केले. पवन अडकमोल याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
नातेवाईकांचा आक्रोश
अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करत गर्दीवर नियंत्रण मिळविले. दरम्यान, शासकीय रुग्णालयात विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांसह मित्रमंडळींनी मोठा आक्रोश केला.
या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. अपघातास कारणीभूत ठरलेल्या वाहनाचा आणि चालकाचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.









