सावदा येथे कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक; ३.३० लाखांचा मुद्देमाल जप्त


सावदा | प्रतिनिधी : कत्तलीच्या उद्देशाने जनावरांना अमानुषपणे बांधून वाहनातून वाहतूक केल्याप्रकरणी सावदा पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत छोटा हत्ती वाहनासह एक गाय व एक गोऱ्हा असा एकूण ३ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सावदा शहरातील ख्वाजा नगरसमोरील मरीमाता मंदिराजवळ रस्त्यावर २२ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ८.५० वाजता ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी पोहेकॉ. मोहसिन खान शब्बीरखान पठाण यांनी सावदा पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
तक्रारीनुसार, वाहन क्रमांक एमएच-४८ एजी-५८०४ मधून जनावरांची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी वाहनाची तपासणी केली. त्यावेळी वाहनामध्ये सुमारे ३० हजार रुपये किमतीची एक गाय आणि एक गोऱ्हा आढळून आला.
जनावरांना त्यांच्या गळ्यास व पायांना दोराने बांधून, हालचालीस पुरेशी जागा न ठेवता वाहनातून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेले जात असल्याचे तक्रारीत नमूद आहे. जनावरांना कोणतीही काळजी न घेता कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक केली जात असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
या प्रकरणी अदनान शेख शगीर कुरैशी (वय १९, रा. इस्लामपुरा, खाटकीवाडा, सावदा) आणि निलेश रमेश पाटील (वय ४४, रा. प्लॉट भाग, टेलिफोन एक्स्चेंजजवळ, सावदा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा, प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम आणि मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.या कारवाईत ३ लाख रुपयांचे टाटा एस वाहन आणि ३० हजार रुपये किमतीची दोन जनावरे, असा एकूण ३ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.पुढील तपास पोना. जाकीर मंसुरी करीत आहेत.









