जळगाव तालुक्यातील आसोदा येथे जुन्या वादातून तरुणाला मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा
चापट-बुक्क्यांनी मारहाण करून दुखापत; जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप


जळगाव | प्रतिनिधी : जळगाव तालुक्यातील आसोदा येथे मागील भांडणाच्या कारणावरून एका तरुणाला चौघांनी मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
असोदा येथे मारहाण
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी उमाकांत रमेश कोळी (वय २८, व्यवसाय मजुरी, रा. आसोदा, ता. जळगाव) यांना २१ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ९ वाजता आसोदा येथील सद्गुरू किराणा दुकानाजवळ मारहाण करण्यात आली.
या प्रकरणात राहुल बाबुलाल माळी, विशाल बाबुलाल माळी, किशोर माळी आणि बाबुलाल माळी (सर्व रा. आसोदा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चापट-बुक्क्यांनी मारहाण
फिर्यादीनुसार, किशोर माळी याने उमाकांत कोळी यांना चापट-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर राहुल माळी याने डाव्या बाजूच्या कपाळावर मारहाण केली. विशाल माळी याने उजव्या हाताच्या मनगटावर मारून दुखापत केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
यानंतर चौघांनी शिवीगाळ करून, “तू जर आमच्या भांडणात पडला तर तुला जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी दिल्याचा आरोप आहे.
चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
या घटनेप्रकरणी उमाकांत कोळी यांच्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २५१/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ३५२, ३५१(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार सोपान पाटील करीत आहेत. आरोपींना अद्याप अटक झालेली नसल्याचे नोंदविण्यात आले आहे.









