मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे सिलिंडर चोरीला


घरगुती व व्यावसायिक वापराचे एकूण ४६ गॅस सिलिंडर लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
मुक्ताईनगर : मुक्ताईनगर ते मलकापूर मार्गावरील एनएच-७५३एल रस्त्यालगत असलेल्या इंडियन गॅस गोडाऊनमध्ये अज्ञात चोरट्याने घरफोडी करून तब्बल ८४ हजार २०१ रुपये किमतीचे ४६ गॅस सिलिंडर चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजेपासून १८ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या कालावधीत घडली. गोडाऊनमध्ये अज्ञात चोरट्याने प्रवेश करून घरगुती तसेच व्यावसायिक वापराचे गॅस सिलिंडर चोरून नेले.
४६ सिलिंडर लंपास
चोरीस गेलेल्या मुद्देमालामध्ये १४.२ किलो वजनाचे २४ रिकामे घरगुती गॅस सिलिंडर, अंदाजे ५२ हजार ८०० रुपये किमतीचे, १० किलो वजनाचे ३ रिकामे घरगुती सिलिंडर, अंदाजे ९ हजार रुपये किमतीचे, तसेच १० किलो वजनाचे ३ भरलेले घरगुती गॅस सिलिंडर, अंदाजे ११ हजार ३१ रुपये किमतीचे आणि ५ किलो वजनाचे ६ भरलेले व्यावसायिक गॅस सिलिंडर, अंदाजे ११ हजार ३७० रुपये किमतीचे सिलिंडर चोरीस गेले आहेत.अशा प्रकारे एकूण ४६ गॅस सिलिंडर, ज्यांची एकत्रित किंमत ८४ हजार २०१ रुपये आहे, अज्ञात चोरट्याने लंपास केले.
या प्रकरणी दीपक समाधान कवळे (वय ४३, व्यवसाय मॅनेजर, रा. धरणगाव, ता. मलकापूर, जि. बुलढाणा) यांच्या फिर्यादीवरून १८ ऑगस्ट रोजी दुपारी २.३४ वाजता मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३२१/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(४) व ३०५(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोहेकॉ ३०२ लिलाधर भोई करीत आहेत. अज्ञात चोरट्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू असून, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.









