आरटीओ एजंटला ६ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले


लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
जळगाव : दिव्यांग तक्रारदाराच्या कारचे कायमस्वरूपी पासिंग करून देण्यासाठी आरटीओ कार्यालयातील अधिकारी व संबंधित कर्मचाऱ्यांच्या नावाने लाचेची मागणी करून ती स्वीकारणाऱ्या खासगी एजंटला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. योगेश रामभाऊ पाटील (वय ३९, रा. आदर्शनगर) असे अटक करण्यात आलेल्या एजंटचे नाव आहे. ही कारवाई १७ ऑगस्ट रोजी जळगाव आरटीओ कार्यालयात करण्यात आली.
तक्रारदार दिव्यांग असून त्यांनी १ जुलै रोजी खान्देश मोटर्सच्या शोरूममधून कार खरेदी केली होती. ३ ऑगस्ट रोजी शोरूममधील खासगी एजंट योगेश पाटील याच्यामार्फत कारचे आरटीओ कार्यालयात तात्पुरते रजिस्ट्रेशन करण्यात आले.
कारमध्ये हॅंडकिट बसविल्यानंतर तक्रारदार १२ ऑगस्ट रोजी कारचे कायमस्वरूपी पासिंग करून घेण्यासाठी आरटीओ कार्यालयात गेले होते. त्यावेळी योगेश पाटील याने आरटीओ कार्यालयातील ‘साहेब’ तसेच संबंधित टेबलवरील कर्मचाऱ्यांच्या नावाने काम करून देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागितल्याचे तक्रारीत नमूद आहे.
लाचेच्या रकमेसंदर्भात तडजोड झाल्यानंतर रक्कम कमी करण्यात आली. तक्रारदाराने १७ ऑगस्ट रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एजंट योगेश पाटील याने ६ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला. लाचेची ६ हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना योगेश पाटील याला पथकाने रंगेहाथ पकडले.
या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, योगेश पाटील याला रात्री उशिरा अटक करण्यात आली. प्रकरणाचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात येत आहे









