पाचोऱ्यात घरफोडी; ९१ हजारांचा ऐवज लंपास
पाचोरा : शहरातील भास्कर नगर परिसरात घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून तब्बल ९१ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजेपासून ते १६ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेपर्यंतच्या कालावधीत ही घरफोडी झाली. फिर्यादी शुभम राजेंद्र जाधव यांच्या बहिणीचे भास्कर नगर, पाचोरा येथील घर बंद होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात इसमाने घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.
चोरट्याने घरातील ९० हजार रुपयांची रोकड तसेच अंदाजे १ हजार ५०० रुपये किमतीचे चांदीचे पैंजण असा एकूण ९१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. घरफोडीचा प्रकार लक्षात आल्यानंतर फिर्यादीने पाचोरा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३८१/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(अ), ३३१(३) व ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर पोलिसांनी अज्ञात चोरट्याचा शोध सुरू केला असून, परिसरातील हालचाली आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे तपास केला जात आहे.
फिर्यादी शुभम राजेंद्र जाधव (वय २६, व्यवसाय खासगी नोकरी, रा. गोराडखेडा खुर्द, ता. पाचोरा, जि. जळगाव) यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल क्रमांक १३२८ गजानन देशमुख करीत आहेत.









