घरफोडी करणाऱ्या टोळीचा एमआयडीसी पोलिसांकडून पर्दाफाश; तिघे ताब्यात


मध्य प्रदेश, बुलडाणा आणि भुसावळातून आरोपी जेरबंद; ६ लाख ६८ हजार ७९० रुपयांचा मुद्देमाल जप्त
जळगाव : घरफोडी करून चोरी करणाऱ्या टोळीचा एमआयडीसी पोलिसांनी पर्दाफाश केला असून, तीन संशयित आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींकडून चोरीची रोकड, सोन्याचे दागिने आणि मोटारसायकल असा एकूण ६ लाख ६८ हजार ७९० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या या कारवाईमुळे घरफोडी करणाऱ्या टोळ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिरसोली येथील रहिवासी राजेंद्र दौलत आंबाडकर हे ३० एप्रिल रोजी रात्री ९ वाजता घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. ५ मे रोजी सकाळी ९ वाजता ते घरी परतले असता घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तुटलेला दिसला. घरात प्रवेश केल्यानंतर साहित्य अस्ताव्यस्त पडलेले आढळून आले. घरफोडी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
तांत्रिक तपासातून आरोपींचा माग काढला
या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३७०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ (अ), ३३१ (३) व ३३१ (४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी, उपलब्ध माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा माग काढला. तपासादरम्यान चोरीच्या गुन्ह्यातील तीन संशयित निष्पन्न झाले.
पोलिसांनी मुन्ना शहा सुलतान शहा (वय २२, रा. होळकापूर पोलीस चौकी, बुऱ्हाणपूर, मध्य प्रदेश) याला बुऱ्हाणपूर येथून ताब्यात घेतले.
दुसरा संशयित मुस्तकीन ऊर्फ जुनेद भिकन शहा (वय २३, रा. बिस्मिल्ला चौकी, तांबापुरा, जळगाव; हल्ली रा. शिरसोली) याला बुलडाणा जिल्ह्यातील सैलानी धाड परिसरातून ताब्यात घेण्यात आले.
तर तिसरा संशयित जाबीर शहा जावेद शहा (वय २०, रा. मुस्लिम कॉलनी, बडी खानजवळ, भुसावळ) याला भुसावळ येथून ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी मुस्तकीन ऊर्फ जुनेद शहा याच्यावर रामानंद, पाळधी, भुसावळ, जिल्हापेठ आदी पोलीस ठाण्यांमध्ये यापूर्वी गुन्हे दाखल आहेत. आरोपींकडून १० हजार रुपये रोकड, सोन्याचे दागिने आणि मोटारसायकल असा एकूण ६ लाख ६८ हजार ७९० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या पथकाने केली.
कारवाईत पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र उगले, पोलीस नाईक प्रदीप चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल रमाकांत साळुंखे, नितीन ठाकूर, गणेश ठाकरे, शशिकांत मराठे, योगेश घुगे आदींचा सहभाग होता.









