आंचलवाडी ग्रामपंचायतीचा आदर्श; स्वातंत्र्यदिनी युवकांच्या हस्ते ध्वजारोहण


अंचलवाडी, ता. अमळनेर : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत अंचलवाडी ग्रामपंचायतीने युवकांना नेतृत्वाची संधी देत एक अभिनव आणि प्रेरणादायी पाऊल उचलले. ग्रामपंचायत कार्यालय तसेच जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत युवकांच्या हस्ते ध्वजारोहण करून “युवकांना संधी देणे ही काळाची गरज आहे” हा सकारात्मक संदेश गावासह तालुक्यासमोर ठेवण्यात आला.
ग्रामपंचायत कार्यालय येथे तुषार राजेंद्र पाटील (रवंदळे) यांच्या हस्ते, तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वासुदेव दादाभाऊ पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचा मान देण्यात आला.
या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे युवकांना सन्मान आणि नेतृत्वाची संधी मिळावी, यासाठी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील नागरिकांनी एका विचाराने पुढाकार घेत नवीन आणि सकारात्मक विचार स्वीकारला. युवकांना केवळ कार्यक्रमातील उपस्थितीपुरते मर्यादित न ठेवता त्यांना प्रत्यक्ष जबाबदारी देण्याचा निर्णय घेण्यात आला.
गावाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सार्वजनिक जीवनात युवकांचा सहभाग वाढावा, त्यांच्यात नेतृत्वगुण विकसित व्हावेत आणि नव्या पिढीला जबाबदारीची जाणीव व्हावी, या व्यापक दृष्टिकोनातून घेण्यात आलेला हा निर्णय निश्चितच कौतुकास्पद आहे.
आज अनेक ठिकाणी पारंपरिक पद्धतीने कार्यक्रम होत असताना अंचलवाडी ग्रामपंचायतीने युवकांना प्राधान्य देत नवा आदर्श निर्माण केला आहे. सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे घेतलेल्या या निर्णयातून गावाच्या विकासात नव्या पिढीला सहभागी करून घेण्याची सकारात्मक मानसिकता दिसून येते.
युवकांवर विश्वास ठेवला, त्यांना संधी दिली आणि जबाबदारी सोपवली, तर ते गावाच्या विकासाचे सक्षम नेतृत्व करू शकतात, हा संदेश या उपक्रमातून अधोरेखित झाला.
तालुक्यात युवकांना प्राधान्य देणाऱ्या ग्रामपंचायती म्हणून अंचलवाडी ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, इतर ग्रामपंचायतींनीही अशा युवकाभिमुख उपक्रमांचा आदर्श घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.









