शेतकऱ्याच्या शेतातून २२ क्विंटल तयार केळीची चोरी; ३९ हजारांचा माल लंपास


रावेर तालुक्यातील मंगरूळ शिवारातील घटना; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
रावेर : रावेर तालुक्यातील मंगरूळ शिवारात शेतात काढणीस तयार असलेल्या केळीच्या पिकावर चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना समोर आली आहे. अज्ञात चोरट्यांनी तब्बल २२ क्विंटल तयार केळीचा घड शेतातून चोरून नेला. चोरी झालेल्या केळीची अंदाजे किंमत ३९ हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेती व्यावसायिक श्रुतेश किशोर पाटील (वय ३१, रा. के-हाळे बुद्रुक, ता. रावेर) यांच्या मंगरूळ शिवारातील शेतगट क्रमांक १८९ मध्ये केळीचे पीक घेतलेले आहे. दि. १२ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने त्यांच्या शेतातील काढणीस तयार असलेले सुमारे १५० ते २०० केळीचे घड, त्यातील अंदाजे २२ क्विंटल माल चोरून नेला.
शेतात पाहणी केल्यानंतर केळीचे घड गायब असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर शेतकऱ्याने रावेर पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. चोरून नेण्यात आलेल्या केळीची अंदाजे किंमत ३९ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी नोंदविले आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३८५/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केळी हे रावेर तालुक्यातील प्रमुख नगदी पीक असून, काढणीच्या अवस्थेतील तयार मालाची चोरी झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतातील तयार पिकांची सुरक्षा हा शेतकऱ्यांसमोर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ. २८३७ योगेश महाजन करीत आहेत.









