जळगाव : गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील कृत्रिम बुद्धिमत्ता व डेटा सायन्स विभागातर्फे आयोजित कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा सायन्समधील उदयोन्मुख प्रवाह व परिवर्तनकारी प्रगती या विषयावरील पाच दिवसीय राष्ट्रीय शिक्षक विकास कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली. दि. ३ ते ७ ऑगस्ट २०२६ दरम्यान ऑनलाइन पद्धतीने झालेल्या या कार्यक्रमाला देशभरातील प्राध्यापक, संशोधक व उद्योग क्षेत्रातील व्यावसायिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. गोदावरी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांच्या प्रेरणेतून, सचिव डॉ. वर्षा उल्हास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विभागप्रमुख डॉ. अनिलकुमार विश्वकर्मा हे कार्यक्रमाचे संयोजक, तर सहाय्यक प्राध्यापक दिशा साळुंके समन्वयक होत्या.कार्यक्रमादरम्यान तज्ज्ञांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, डीप लर्निंग, जनरेटिव्ह एआय, लार्ज लँग्वेज मॉडेल्स, बिग डेटा, सायबर सुरक्षा तसेच संशोधन व नवोपक्रम याबाबत मार्गदर्शन केले. पहिल्या दिवशी अस्पायरया कन्सल्टिंगचे संस्थापक पंकज वानखेडे यांनी एआय व डाटा सायन्सच्या मूलभूत संकल्पना आणि भविष्यातील संधी स्पष्ट केल्या. रोहन फेगडे यांनी मशीन लर्निंग तंत्रे तसेच डाटा सायन्स व बिग डेटाचे उपयोग यावर मार्गदर्शन केले.कॅप जेमिनीचे जनरेटिव्ह एआय डेव्हलपर उमेश ठाकूर यांनी डीप लर्निंग आणि प्रगत एआय विषयावर मार्गदर्शन केले. तेजस्विनी कोपर्डे यांनी संशोधन दिशा, बौद्धिक संपदा हक्क, संशोधन निधी व प्रकल्प प्रस्ताव लेखनाबाबत माहिती दिली. पवन शिंपी यांनी सुरक्षित एआय उपयोजन आणि सायबर सुरक्षू यावर मार्गदर्शन केले.कार्यक्रमात सहभागी प्रियांका कुलकर्णी यांनी उपयुक्त व अद्ययावत मार्गदर्शन मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. या उपक्रमाचे गोदावरी फाउंडेशनचे डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील, डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील आणि डॉ. अनिकेत पाटील यांनी कौतुक केले.










