विहिरीवर पाणी काढताना पाय घसरून पडल्याने २२ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पिंपळगाव हरेश्वर पोलिसांत नोंद


पिंपळगाव हरेश्वर (विशेष प्रतिनिधी): शेतातील विहिरीवर पाणी काढण्यासाठी गेलेल्या एका २२ वर्षीय विवाहितेचा पाय घसरून विहिरीत पडल्याने पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील दातपहाडी (ता. खकनार, जि. बुरुहानपूर, मध्य प्रदेश) येथील मूळ रहिवासी असलेल्या ज्योती गोपाळ जमरे (वय २२) असे मृत विवाहितेचे नाव आहे. ही घटना ८ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ८:३० वाजेच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्योती जमरे ही ८ ऑगस्ट रोजी रात्री शेतातील विहिरीवर पाणी काढण्यासाठी गेली असता अचानक पाय घसरून विहिरीतील खोल पाण्यात पडली. ही बाब तिचा पती गोपाळ सिताराम जमरे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शेजारील कैलास पावरा, रितेश पावरा व बदमाश पावरा यांच्या मदतीने विहिरीत शोध घेतला, परंतु अंधार आणि विहिरीत जास्त पाणी असल्याने ती आढळून आली नाही.
त्यानंतर नातेवाईकांनी रात्रभर विहिरीजवळ थांबून ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास गणेश श्रीधर बडगुजर, पिंटू रवींद्र देशमुख आणि सोहेल गुलाब तडवी यांच्या मदतीने मृतदेह विहिरीबाहेर काढला. मृतदेह तातडीने पुढील वैद्यकीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय, पिंपळगाव येथे नेला असता तेथील डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले.
या प्रकरणी खबर दिल्यावरून पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पोलीस उपनिरीक्षक राजू विष्णू सांगळेया प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.









