इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी निघालेला तरुण रेल्वे अपघातात ठार


मोबाईल घेण्यासाठी धावत्या रेल्वेतून उतरण्याचा प्रयत्न जीवावर बेतला; १९ वर्षीय यश पाटीलचा दुर्दैवी मृत्यू
चाळीसगाव : इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी धुळे येथे जात असलेल्या १९ वर्षीय तरुणाचा रेल्वे अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. चाळीसगाव तालुक्यातील जामदा रेल्वेस्थानकावर शनिवारी (८ ऑगस्ट) सकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. यश गणेश पाटील (वय १९, रा. तारखेडा, ता. पाचोरा) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेने तारखेडा गावावर शोककळा पसरली आहे.
मोबाईल घेण्याचा प्रयत्न जीवावर बेतला
यश हा इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी धुळे येथील महाविद्यालयात जाण्यासाठी शनिवारी सकाळी रेल्वेने निघाला होता. पाचोऱ्याहून सेवाग्राम एक्स्प्रेसने चाळीसगाव येथे आल्यानंतर तो चाळीसगाव-धुळे मेमूने पुढील प्रवास करत होता.
मेमू जामदा रेल्वेस्थानकावर थांबण्याच्या बेतात असताना दरवाजाजवळ उभ्या असलेल्या यशच्या हातातील मोबाईल प्लॅटफॉर्मवर पडला. मोबाईल घेण्यासाठी त्याने गाडीतून उतरण्याचा प्रयत्न केला. याचवेळी त्याचे दोन्ही पाय प्लॅटफॉर्म आणि रेल्वेगाडीच्या मध्ये अडकले. काही क्षणांत घडलेल्या या दुर्घटनेत त्याच्या पायांना गंभीर दुखापत झाली.
रुग्णालयात नेत असतानाच मृत्यू
अपघाताची माहिती मिळताच यशला तातडीने रुग्णवाहिकेतून मेहुणबारे येथील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी चाळीसगाव रेल्वे पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
उच्च शिक्षणाचे स्वप्न अधुरेच
यश हा इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी धुळे येथे जात होता. त्याच्या वडिलांनी त्याला दुसऱ्या दिवशी जाण्याचा सल्ला दिला होता. मात्र, प्रवेश प्रक्रियेसाठी यशने त्याच दिवशी जाण्याचा निर्णय घेतला. त्याला रेल्वेस्थानकावर सोडण्यासाठी वडील स्वतः पाचोरा येथे आले होते. त्यानंतर काही वेळातच यशसोबत ही दुर्दैवी घटना घडली.
यश हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. उच्च शिक्षण घेऊन उज्ज्वल भवितव्य घडवण्याचे त्याचे स्वप्न होते. मात्र, एका क्षणाच्या दुर्दैवी अपघाताने त्याचे हे स्वप्न अधुरेच राहिले. यशच्या मृत्यूची बातमी समजताच पाटील कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.








