भडगाव शहरात मद्यधुंद पिकअप चालकाचा थरार; रस्त्यावरील वाहनांना धडक देऊन केले नुकसान, आरोपीवर गुन्हा दाखल


भडगाव (विशेष प्रतिनिधी): भडगाव शहरातील यशवंतनगर भागात दारूच्या नशेत अनियंत्रित पिकअप चालवणाऱ्या एका चालकाने रस्त्यावरील वाहनांना जोरदार धडक देऊन मोठा अपघात घडवून आणला आहे. ७ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री १०:३० वाजेच्या सुमारास नूराणी मशिदीच्या मागील बाजूस असलेल्या सार्वजनिक रस्त्यावर हा प्रकार घडला. या प्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी विकास गोकुळ चौधरी (रा. यशवंतनगर, भडगाव) हा त्याच्या ताब्यातील विनापासिंगची बोलेरो पिकअप (चेसिस क्र. MA1RV2TUKT6H 19817 व इंजिन क्र. TUT4G30477) मद्यधुंद (दारूच्या नशेत) अवस्थेत चालवत होता. रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून अत्यंत हायगयीने व अविचाराने वाहन चालवत त्याने गल्लीत उभ्या असलेल्या वाहनांना धडक दिली.
या अपघातात तक्रारदार आजीमबेग अनवरबेग मिर्झा (वय ३५, व्यवसाय- मोबाईल दुरुस्ती, रा. यशवंतनगर, भडगाव) यांची मोटरसायकल तसेच इतर साक्षीदारांची वाहने आणि एका हातगाडीचे जबर धडक बसून मोठे नुकसान झाले.
या घटनेनंतर आजीमबेग मिर्झा यांनी भडगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यांच्या फिर्यादीवरून ८ ऑगस्ट २०२६ रोजी पहाटे १:४३ वाजेच्या सुमारास आरोपी चालक विकास चौधरी याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम २८१, ३२४(४) सह मोटर वाहन कायदा (MV Act) १८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे (गुन्हा रजि. नं. २५२/२०२६).
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक श्री. सुशिल सोनवणे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय धर्मा जाधव (पोहेकॉ/३१७३) या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.









