‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून यावलच्या वृद्धाला ९ लाखांचा गंडा; जळगाव सायबर पोलिसांत गुन्हा


टीआरएआय व मुंबई क्राईम ब्रांचच्या नावाने बनावट व्हॉट्सॲप कॉल; अज्ञात सायबर भामट्यावर गुन्हा दाखल
जळगाव:
सायबर भामट्यांनी आता थेट केंद्र सरकारचे अधिकारी आणि मुंबई पोलिसांचे नाव सांगून नागरिकांना जाळ्यात ओढण्यास सुरुवात केली आहे. ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून यावल येथील एका ६० वर्षीय ज्येष्ठाला तब्बल ९ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यावल येथील देशपांडे गल्लीत राहणारे राजेश बाळकृष्ण यावलकर (वय ६०) यांच्या मोबाईलवर ३० मार्च २०२६ रोजी एका अज्ञात क्रमांकावरून (८१०९९४६१४३) व्हॉट्सॲप कॉल आला. फोन करणाऱ्या भामट्याने स्वतःची ओळख ‘टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया’ (TRAI) चा अधिकारी म्हणून दिली.
“तुमच्या एअरटेल मोबाईल नंबरवरून मुंबईतील नागरिकांना लैंगिक शोषणाचे (Sexual Exploitation) व्हिडिओ पाठवले जात असून, त्याबाबत MCB क्राईम ब्रांच मुंबई यांच्याकडून नोटीस प्राप्त झाली आहे,” असा खोटा बनाव सायबर भामट्याने रचला. या अचानक आलेल्या कॉलमुळे ज्येष्ठ नागरिक राजेश यावलकर प्रचंड घाबरले.
त्यांच्या या भीतीचा गैरफायदा घेत भामट्याने त्यांना “तुम्हाला प्रत्यक्ष अटक न करता ‘डिजिटल अरेस्ट’ केले जात आहे,” असे सांगून व्हिडिओ/व्हॉट्सॲप कॉलवर सतत लक्ष ठेवून असल्याची भीती दाखवली. कारवाई टाळायची असेल तर पैसे द्यावे लागतील, असे सांगून ३० मार्च ते ८ एप्रिल २०२६ या कालावधीत सायबर भामट्याने यावलकर यांच्याकडून टप्प्याटप्प्याने तब्बल ९ लाख रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करून घेतले.
आपली मोठी आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर यावलकर यांनी सायबर पोलिसांत धाव घेतली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शुक्रवारी (७ ऑगस्ट) जळगाव सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३३६(२), ३३६(३) आणि माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act) ६६(डी) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर करत आहेत.









