बारी समाज माध्यमिक विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी

महापुरुषांच्या विचारांचा विद्यार्थ्यांना प्रेरणादायी वारसा
शिरसोली | प्रतिनिधी : शिरसोली येथील बारी समाज माध्यमिक विद्यालयात शुक्रवार, दि. १ ऑगस्ट रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्रभारी पर्यवेक्षक सुनील भदाणे हे होते. त्यांच्या हस्ते लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी लोकमान्य टिळक यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानावर प्रकाश टाकला. तसेच “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच” या त्यांच्या प्रेरणादायी घोषणेचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगत राष्ट्रप्रेम, स्वाभिमान आणि कर्तव्यनिष्ठेची प्रेरणा दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन. ए. अकोले मॅडम यांनी केले. ज्येष्ठ शिक्षिका एस. पी. दुबे मॅडम यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, समाजप्रबोधन आणि सामाजिक समतेसाठीच्या कार्याचा आढावा घेत विद्यार्थ्यांना त्यांच्या विचारांचा आदर्श अंगीकारण्याचे आवाहन केले.
यावेळी दिपाली पाटील तसेच सांस्कृतिक विभाग प्रमुख जी. बी. काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन एल. एस. पाटील यांनी केले.
कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना दोन्ही महापुरुषांचे कार्य, विचार आणि समाजासाठीचे योगदान जाणून घेण्याची संधी मिळाली. विद्यालयात देशभक्ती व सामाजिक समतेचा संदेश देणारे वातावरण निर्माण झाले.









