मुसळधार पावसाचा तडाखा; गांधी चौकातील नगरपालिकेची जुनी इमारत कोसळली

मोठा अनर्थ टळला; नगरसेविका सायलीताई जाधव यांनी केली पाहणी
चाळीसगाव | प्रतिनिधी : चाळीसगाव शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका शुक्रवारी गांधी चौक परिसराला बसला. नगरपालिकेची जुनी व जीर्ण इमारत अचानक कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने घटना घडली त्यावेळी इमारतीजवळ कोणीही नसल्याने कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
घटनेची माहिती मिळताच नगरसेविका सौ. सायलीताई रोशन जाधव यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देत परिसर सुरक्षित करण्याच्या सूचना दिल्या.
त्यांच्या निर्देशानुसार नगरपरिषदेचे मुकादम राकेश जाधव तसेच नगरपरिषदेचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पडझड झालेल्या इमारतीभोवती सुरक्षा व्यवस्था उभारून मलबा हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले.
इमारत कोसळल्याची बातमी वाऱ्यासारखी शहरभर पसरताच गांधी चौक परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली. प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली आणि नागरिकांना सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन केले.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित इमारत अनेक वर्षांपासून जीर्ण अवस्थेत होती. सततच्या पावसामुळे तिची रचना कमकुवत झाल्याने ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर शहरातील इतर जीर्ण व धोकादायक इमारतींचे तातडीने सर्वेक्षण करून आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना जीर्ण इमारतींपासून दूर राहण्याचे तसेच धोकादायक ठिकाणी गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे. आगामी काळात अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबविण्याची गरज व्यक्त होत आहे.









