गिरणा धरण १०० टक्के भरण्याच्या उंबरठ्यावर; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

चाळीसगाव | प्रतिनिधी
गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धरणाचे दरवाजे उघडून गिरणा नदीपात्रात अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असून यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पाटबंधारे उपविभाग, चाळीसगाव यांनी प्रसिद्ध केलेल्या सूचनेनुसार, ३० जुलै रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत गिरणा धरणात २०६.५३ दलघमी (९६.७९ टक्के) इतका पाणीसाठा झाला आहे. पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणात पाण्याची आवक सातत्याने वाढत असून धरण लवकरच १०० टक्के क्षमतेने भरण्याची शक्यता आहे.यामुळे धरणाच्या सुरक्षिततेसाठी नियोजनबद्ध पद्धतीने अतिरिक्त पाणी गिरणा नदीपात्रात सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नागरिकांना प्रशासनाचे आवाहन
पाटबंधारे विभागाने गिरणा नदीच्या दोन्ही तीरावरील गावांतील नागरिकांना नदीपात्रात किंवा नदीकाठी जाणे टाळावे, जनावरे व शेतीसाहित्य सुरक्षित ठिकाणी हलवावे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन केले आहे. संबंधित सर्व शासकीय विभागांनीही आपापल्या यंत्रणांना सतर्कतेच्या सूचना देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ही सूचना पाटबंधारे उपविभाग, चाळीसगावचे उपविभागीय अभियंता विजय जाधव यांनी प्रसिद्ध केली आहे.









