बालनिकेतन विद्या मंदिर परिसरातील धोकादायक पुलाची उपमहापौर मनोज चौधरी यांच्याकडून पाहणी

अप्रिय घटना घडण्यापूर्वी तात्काळ उपाययोजना करण्याचे मनपा बांधकाम विभागाला निर्देश
बालनिकेतन विद्या मंदिर, विवेकानंद नगर परिसरातील नाल्यावरून जाणाऱ्या धोकादायक पुलाची आज उपमहापौर मनोज चौधरी यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीदरम्यान पुलाची अत्यंत दुरवस्था झाल्याचे निदर्शनास आले.
हा पूल विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक बनला असून, येथे कोणतीही अनचित घटना घडू नये यासाठी महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना तात्काळ आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश उपमहापौर मनोज चौधरी यांनी दिले आहेत.
४०० ते ५०० विद्यार्थ्यांचा दैनंदिन धोकादायक प्रवास
बालनिकेतन विद्या मंदिर शाळेची एकूण पटसंख्या १,००० पेक्षा जास्त आहे. त्यापैकी दररोज सुमारे ४०० ते ५०० लहान विद्यार्थी शाळेत ये-जा करण्यासाठी याच पुलाचा वापर करतात. पाहणीदरम्यान पुलाची दुरवस्था झालेली दिसलीच, शिवाय शाळेच्या बाजूने असलेली सुरक्षेची जाळीही तुटलेल्या अवस्थेत आढळली. यामुळे लहान विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात सापडण्याची तीव्र शक्यता निर्माण झाली आहे.
नवीन पूल होईपर्यंत वापर टाळण्याचे आवाहन
उपमहापौर मनोज चौधरी यांनी या संदर्भात बालनिकेतन विद्या मंदिराच्या मुख्याध्यापकांशी चर्चा केली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा असल्याने “जोपर्यंत नवीन पूल तयार होत नाही, तोपर्यंत विद्यार्थ्यांनी व पालकांनी या धोकादायक पुलाचा वापर टाळावा,” अशा स्पष्ट सूचना त्यांनी मुख्याध्यापकांना दिल्या.
”शाळकरी विद्यार्थ्यांची सुरक्षितता ही आमची पहिली प्राथमिकता आहे. हा धोकादायक पूल आणि तुटलेली जाळी यामुळे कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी महापालिका प्रशासनाला तात्काळ कारवाईच्या सूचना दिल्या आहेत.”
— मनोज चौधरी, उपमहापौर









