कर्जाच्या ओझ्याला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

अमळनेर तालुक्यातील खेडी गावातील घटना; परिसरात हळहळ
अमळनेर | प्रतिनिधी : अमळनेर तालुक्यातील खेडी येथील ३२ वर्षीय तरुण शेतकरी श्याम सुनील पाटील यांनी कथित कर्जबाजारीपणाला कंटाळून विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना रविवारी (२७ जुलै) उघडकीस आली. या घटनेमुळे खेडी परिसरात शोककळा पसरली आहे.
माहितीनुसार, श्याम पाटील हे २६ जुलै रोजी रात्री सुमारे १०.३० वाजता घरातील कोणालाही काहीही न सांगता घराबाहेर पडले. रात्री उशिरापर्यंत ते घरी न परतल्याने कुटुंबीयांनी व ग्रामस्थांनी त्यांचा शोध सुरू केला.
शोधादरम्यान गावालगतच्या शेतातील विहिरीत त्यांनी उडी घेतल्याचे निदर्शनास आले. ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत त्यांना विहिरीतून बाहेर काढले. त्यानंतर त्यांना ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
शवविच्छेदनानंतर दुपारी सुमारे अडीच वाजता शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
श्याम पाटील यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ आणि बहिण असा परिवार आहे.









