चोपडा |(प्रतिनिधी ) – जळगाव जिल्ह्यात अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात चोपडा ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत ७ किलो ११६ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला असून, या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत गांजा, कार, मोटारसायकल आणि मोबाईल फोन असा एकूण ६ लाख ८ हजार ९०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २६ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे ११.५३ वाजता लासूर ते हातेड जाणाऱ्या रस्त्यावरील पाटचारीजवळ, हातेड शिवारात चोपडा ग्रामीण पोलीस पथक गस्त घालत असताना एका संशयित वाहनाची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान कारमध्ये लपवून ठेवलेला ७ किलो ११६ ग्रॅम गांजा आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत वाहनातील तिघांना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये विष्णू सुभाष सुळे (वय ३७, रा. पिंप्री, जि. पुणे), प्रकाश बबन शिंदे (वय ३०, रा. टाकळीमिया, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) आणि प्रशांत ताराचंद अथाणी (वय २९, रा. टाकळीमिया, देवळालीप्रवरा, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) यांचा समावेश आहे.
या कारवाईत आरोपींकडून ७ किलो ११६ ग्रॅम गांजा (किंमत १,७७,९००), हुंडाई सॅन्ट्रो कार (३,००,०००), पल्सर मोटारसायकल (९०,०००) तसेच विविध कंपन्यांचे पाच मोबाईल फोन (४१,०००) असा एकूण ६,०८,९०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २४६/२०२६ अन्वये अमली पदार्थ व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (एनडीपीएस ॲक्ट), १९८५ मधील कलम २०(ब) व २२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, अमली पदार्थांच्या पुरवठा साखळीचा तपास पोलीस करीत आहेत.
जळगाव जिल्ह्यात अमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी अशा प्रकारच्या धडक कारवाया यापुढेही अधिक प्रभावीपणे सुरू राहतील, असा निर्धार जिल्हा पोलिसांनी व्यक्त केला आहे.









